दिवा शहरात आता ९ नगरसेवक,शहराला लागली लाॅटरी
ठाणे – ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून अंतिम प्रभाग रचना शनिवारी सायंकाळी अखेर जाहीर झाली.प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप घेत एकूण 1 हजार 960 हरकती सुचनांचा पाऊस पाडण्यात आला आहे.त्याची काहीसी दखल घेवून प्रारुप आराखड्यातील काही प्रभागांमध्ये थोडेफार बदल करण्यात आले आहेत.मात्र यामध्येही दिव्याला लाँटरी लागली असून येथे आणखी एक नगरसेवक वाढणार आहे.तीन नगरसेवकांचे तीन प्रभाग येथे तयार करण्यात आले आहेत.या अंतिम प्रभाग रचनेत शिवसेनेला अपेक्षित बदल झाले नसून हा पालकमंत्र्यांनाच मोठा फटका मानला जात आहे.
ठाणे महानगरपालिकेचा बिगुल वाजल्यानंतर 1 फेब्रुवारी 2022 रोजी निवडणुक आयोगाने प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली.यापुर्वी चार सदस्य पॅनेलने होणारी निवडणुक यावेळी तीन सदस्य पॅनेलने होणार असल्याने मोठ्या प्रभागांची मोडतोड करुन एकूण 47 प्रभाग तयार करण्यात आले.खाडी अलिकडे आणि पलिकडे हा निकष लावत तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेत मुंब्र्यात तीन नगरसेवकांची संख्या वाढली.तर दिव्यावर अन्याय झाल्याची तक्रार सत्ताधारी शिवसेनेने करत वागळे व दिव्यात नगरसेवक वाढविण्यासाठी फिल्डींग लावली होती.कोपरी प्रभागातही एक नगरसेवक कमी होणार असल्याने आणि रेल्वे रुळ अलिकडचा-पलिकडचा परीसर एक केल्यामुळे येथेही नाराजी पसरली होती.
त्यामुळे ठाणेकरांनी तब्बल 1 हजार 960 हरकती निवडणुक आयोगाकडे नोंदवल्या.त्यामध्ये तब्बल 776 हरकती या एकट्या कोपरी प्रभागातून होत्या.मुंब्यातील वाढलेली नगरसेवक संख्या कमी करुन ठाण्यात नगरसेवकांचा विस्तार करावा,यासाठी पालकमंत्र्यांच्या मदतीने तत्कालीन महापौरांनी आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी जोर लावला होता.मात्र सर्व हे प्रयत्न फेल गेल्याचेच कालच्या अंतिम प्रभाग रचनेवरुन दिसून येत आहे.उलट दिव्यात एक नगरसेवक वाढवून मुंब्यातील नगरसेवक संख्येला कुठेही हात लावण्यात आलेला नाही.त्यामुले हरकती सूचना नोंदविल्यानंतर अपेक्षित बदल पदरात पडेल अशी आशा करत देव पाण्यात ठेवून बसलेल्या इच्छुकांचा हिरमोडच झाला.
प्रभाग क्र.43 जो पुर्वी तन्वरनगर,चंदननगर असा होता तो आता साबे,दिवा प्रभाग म्हणून अंतिम झाला आहे.
प्रभाग क्र.44 जे पुर्वी साबे,दिवा होता.तो आता दातिवली,बेतवडे म्हणून अंतिम झाला आहे.
प्रभाग क्र.45 जो पुर्वी आगासन,बेतवडे होता.तो आता आगासन,बी.आर.नगर झाला आहे.
दिव्यात आता तीन पॅनलचे तीन प्रभाग झाले आहेत.