ठाण्यातील कशेळी पुलावरून उडी मारलेल्या तरुणाचा शोध सुरु.
ठाणे, ता 16 मे (प्रतिनिधी) ठाण्यातील भिवंडीकडे जाणाऱ्या कशेळी उड्डाणपूलावरुन एका २० ते २५ वर्षीय तरुणाने उडी घेतल्याची घटना काल सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या पथकांनीही दोन बोटींद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. कशेळी ब्रिजच्या जवळ मेट्रोच्या पूलाचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे सदर ठिकाणी रविवारीही काही कर्मचारी कामात व्यस्त होते. त्याचवेळी एका तरुणाने या पूलावरुन खाडीमध्ये उडी घेतल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली. या काळात समुद्राला भरती असल्यामुळे भरतीच्या पाण्यात तो पुढे वाहत गेल्याची किंवा उंचावरुन पडल्यामुळे गाळात रुतल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. घटनास्थळी नारपोली
आणि कापूरबावडी पोलिसांचेही पथक दाखल झाले होते.