बदलापूर चिमुरडीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू ; आत्महत्या की एनकाऊंटर !
ठाणे ता 23 सप्टेंबर : महिन्याभरापूर्वी बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. नागरिकांच्या उद्रेकानंतर पोलिसांनी या शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक केली. पण याच आरोपीने आता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याला ट्रान्झिट रिमांडसाठी नेण्यात येत असताना त्याने शेजारी बसलेल्या अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेत स्वतःवर गोळी झाडली आहे. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून या घटनेत त्याचा बचाव करणाऱ्या अधिकाऱ्याला देखील दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अधिक माहितीनुसार, तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता आरोपी अक्षय शिंदे याला बदलापूरला नेण्यात येत होते. याचवेळी त्याने एपीआय निलेश मोरे यांची बंदूक हिसकावून त्याने सुरुवातीला पोलिसांवर गोळी झाडली. ज्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी अक्षयवर तीन गोळ्या झाडल्या. पण महत्त्वाची बाब म्हणजे सर्वात पहिल्यांदा जी बातमी समोर आली, त्यामध्ये अक्षयने स्वतःवर गोळी झाडल्याचे सांगण्यात आले. पण क्षणाक्षणाला बदलत असलेल्या अपडेटमुळे अक्षय शिंदे याने खरंच आत्महत्येचा प्रयत्न केला की त्याचा एन्काउंटर करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या व्हॅनमधून बदलापूर येथे जात असताना मुंब्रा बायपास येथे ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ही एन्काउंटरची घटना घडली आहे. अक्षयने पोलिसांच्या बंदुकीतून एकूण तीन राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतु, या घटनेनंतर आता विरोधकांनी हा मृत्यू म्हणजे एन्काउंटर असल्याचे मत व्यक्त केले आहे. तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.