रेल्वे पोलिसच बनले अमलीपदार्थांची विक्री करणारे तस्कर.
ठाणे, कल्याण ता 17 नोव्हे (संतोष पडवळ) : मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनीच अंमलीपदार्थांची तस्कर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणमधील दुर्गाडी येथे चरसची विक्री करताना ठाणे शहराच्या गुन्हे शाखा आणि अंमलीपदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी ही कारवाई केली. याप्रकरणी कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस हवालदार महेश वसेकर आणि पोलीस शिपाई रवी विशे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपये किंमतीचा ९२१ ग्राम चरस जप्त करण्यात पकडले.
सुमारे ८०० ते ९०० ग्राम चरसची तस्करी होण्याची शक्यता असल्याची तक्रार मुंब्रा येथील तीन तक्रारदारांनी अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडे केली होती. त्यानुसार पथकाने विविध ठिकाणी शोधसत्र सुरू केले. काल दुपारी ३.३० च्या सुमारास कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळील पोलीस हवालदार वसेकर आणि पोलीस शिपाई विशे दोघे वेगवेगळ्या दुचाकीवर आले. या घटनेची माहिती मिळताच पथक तेथे रवाना झाले. अंमलीपदार्थाची तस्कारी करताना या दोघांना पथकातील अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.