‘ताप आला की पाल्याला ताबडतोब आरोग्य केंद्रात घेऊन या, उशीर जीवावर बेतू शकतो’ – अभिजित बांगर, आयुक्त ठामपा.
ठाणे, ता २३ नोव्हे. (संतोष पडवळ ) : आपल्या पाल्याला ताप आला तर तो कसला याची वाट न पाहता, त्याला लगेच नागरी आरोग्य केंद्रात घेऊन यावे. त्याच्यावर उपचार सुरू होतील आणि गोवर असेल तर वेळीच आजार आटोक्यात येईल. उशीर झाला तर ते पाल्याच्या जीवावर बेतू शकते, असा कळकळीचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांना केले आहे.
*हेल्पलाईन २४ तास सुरू*
गोवरबद्दल कोणतीही माहिती हवी असेल तर या ७३०६३३०३३० या हेल्पलाईन वर संपर्क साधावा. ही हेल्पलाईन २४ तास सुरू आहे. रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्यास तेही हेल्पलाईन वर सांगावे. रुग्णवाहिका घरी पाठवली जाईल, असे आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले.
ठाण्यातील गोवर आजाराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त श्री. बांगर यांनी बैठक घेतली. या बैठकीस, उपायुक्त मनीष जोशी, डीन डॉ. योगेश शर्मा, वैद्यकीय अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. वंदना कुमावत, नागरी आरोग्य केंद्र समन्वयक डॉ. राणी शिंदे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.