ठाण्यात विशेष मुलांच्या कलाविष्काराने साजरा झाला जागतिक दिव्यांग दिन
ठाणे (03 डिसें, संतोष पडवळ ) व्यंगत्वावर मात करीत आपल्यातील कलागुण सादर करीत विशेष मुलांनी उपस्थित रसिकांनाही त्यांच्या तालावर ठेका धरायला लावला. निमित्त होते जागतिक दिव्यांग दिनाचे. ठाणे महानगरपालिका, आदित्य प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दिव्यांग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा या विशेष शाळेतील तसेच ठाणे महापालिका हद्दीतील विविध विशेष शाळांमधील दिव्यांग मुले सहभागी झाली होती. यावेळी उपायुक्त वर्षा दीक्षित, समाजविकास अधिकारी दशरथ वाघमारे ,दिव्यांग कला केंद्राचे किरण नाकती, संध्या नाकती , जिद्द शाळेच्या संचालिका अर्चना शेट्ये आदी उपस्थित होते
या निमित्ताने आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग कला केंद्र ठाणे प्रस्तुत ” हम होंगे कामयाब ” या विशेष मुलांचा कलाविष्कार रसिकांना पाहावयास मिळाला. या कार्यक्रमास वेळी दृष्टिहीन वादकांनी गाण्यांना साथ संगत केली , खेळताना रंग बाई होळीचा,मी हाय कोली अशा एका पेक्षा एक बाहदार नृत्यावर दिव्यांग मुलांनी ठेका धरला तर विविध विशेष शाळांमधील मुलांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी चांगलीच दाद दिली. तसेच दृष्टिहीन गायक गायिकांनी अवीट गोडीची गाणी सुरेल आवाजात गात रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी ठाणे महापालिकेच्या उपायुक्त वर्षा दिक्षीत यांनी महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साधना जोशी यांनी केले.
–