दिवा शहरात नशेखोराकडून वयस्कर नागरिकाची हत्या : आरोपी अटकेत
ठाणे, दिवा ता 4 डिसें (संतोष पडवळ ) दिव्यातील स्थानिक असलेले अभिमन्यु काळु पाटील (वय-65) यांचा एका गर्दुल्याने हल्ला केल्याने मृत्यु झाला आहे. आरोपी मोहम्मद झुबेर मो.रऊफ खान (वय-25) याला दिवा पोलिसांनी ताब्यात घेतले असून हल्यामागचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. ही घटना आज रात्रौ.9.30 वाजता साईकुंज अपार्टमेंट,मुंब्रादेवी काँलनी, दिवा,पुर्व येथे घडली. याबाबत दिवा पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री शहाजी शेळके तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहीतीनुसार, अभिमन्यु पाटील (वय-65) हे रेल्वेतील निवृत्त कर्मचारी असून नेहमीप्रमाणे आपल्या बाहेरील बाकावर बसले होते.दरम्यान आरोपी आरोपी मोहम्मद झुबेर मो.रऊफ खान याने अभिमन्यु पाटील यांच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केला.यात त्यांना जबर दुखापत झाली असून पुढील उपचारासाठी काळशेकर दवाखान्यात दाखल करण्यात होते.तत्पुर्वी त्यांचा मृत्यु झाल्याचे वर्तविण्यात आले आहे.
सदर घटनेतील आरोपी मोहम्मद झुबेर मो.रऊफ खान हा गर्दुला असून नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे.आरोपीला दिवा पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी त्याचा मुळ पत्ता अजूनही समजलेला नाही.सध्या तो दिवा रेल्वे ब्रीजवर पडून राहत असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान त्याने एका निष्पाप नागरिकाचा प्राण घेतल्याने परिसरात खळबळ माजली आहे.दिव्यातील ही घटना गंभीर असून यामागे ही हत्या कोणी घडवून आणली का? या हत्येचा काही उद्देश होता का? याचा संपुर्ण तपास दिवा पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शहाजी शेळके करीत आहेत.
या घटनेची माहीती मिळताच दिवा जागो दिवेकरचे प्रणेते श्री विजय भोईर,गणेश भगत, रोहीदास मुंडे,श्री समीर गायकवाड, ओबीसी सेलचे श्री रोशन भगत यांनी दिवा पोलिस चौकीला येथे भेट देवून आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी पोलिसांकडे मागणी केली आहे.