अविकसित दिवा शहराचा नवीमुंबई महानगरपालिकेत समावेश करा – विजय भोईर.
ठाणे, दिवा ता 8 डिसें ( संतोष पडवळ) : ठाणे महानगरपालिका स्थापित होऊन जवळपास ४० वर्षे होऊन गेली. त्यात बरीच खारजमीन, खाडीप्रदेश समाविष्ट झाला. त्यात खूप मोठा भाग म्हणजे दिवा ग्रामीण परिसर ज्यात दातीवली, बेतवडे,साबे, आगासन, म्हातार्डी, देसाई , पडले, खिडकाली शीळ, खार्डी गावांचा असा बराचसा खाडीकिनारी परिसर मनपाने खूप मोठी आश्वासने देऊन समाविष्ट करून घेतला. ज्याला आधीपासूनच भूमीपुत्रांचा विरोध होता परंतु मनपाने काही स्थानिकांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. परंतु दुर्दैवाने आम्ही ठेवलेला विश्वास म्हणजे आमचा विश्वासघातच ठरला. ठाणे मनपा आज इतकी वर्षे होऊन आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवू शकले नाही. पिण्याचे पाणी अजून आम्हाला मिळत नाही याउलट दिव्यातील कित्येक नागरिकांना पिण्याचे पाणी ट्रेनने वाहून आणताना आपला जीव गमवावा लागला. साधे आरोग्य केंद्र, स्वच्छतागृहे नाहीत, अलीकडे जर कोणतीही कामे निघाली तर तीसुद्धा फक्त निव्वळ पैसे कमावण्याचे साधन बनलं. रस्ते दुरुस्ती, गटारे कामे फक्त एक भ्रष्टाचाराचे साधन बनले. दिवा व परिसर जणू काही भ्रष्टाचाराचीच खाण बनला आहे. हेतुपुरस्सर दिव्याला विकासापासून वंचित ठेवलं गेलं. आता आम्हा दिवावासीयांची सहनशक्ती संपली आहे यावर आता एकच तोडगा तो म्हणजे आम्हाला दिवा , ठाणे महानगरपालिकेतून निष्कासित करून नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करावे. तेव्हा आम्हाला नवी मुंबई मनपाने सामील करून घेण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता परंतु आम्ही नकार देऊन नंतर ठाणे मनपात समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला ज्याचा आता आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. तरी आम्ही आमची चूक सुधारू इच्छित आहोत त्यासाठी दिवा ग्रामीण व आजूबाजूच्या परिसराला नवी मुंबईत समाविष्ट करावे, ही नम्र विनंती. कारण नवी मुंबईत देखील भरपूर परिसर दिव्याप्रमाणेच होता परंतु अचूक नियोजन आणि पारदर्शक कारभारामुळे आज नवी मुंबईचा कायापालट आपण पाहत आहोत. म्हणूनच आमची आपणास नम्र विनंती की आपण आम्हाला परत एकदा नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घ्यावे असे “जागा हो दिवेकर” चे संस्थापक व अध्यक्ष
विजय भोईर यांनी निवेदन दिले आहे.