दिवा रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक फलाटावर होणार पाणपोई – दिवा रेल्वे प्रवासी संघटना
ठाणे, दिवा ता 21 डिसें (संतोष पडवळ) : दिवा रेल्वे स्थानकातून मुंबई, कर्जत-कसारा, वसई, पनवेल व कोकण येथे जाणारे लाखो प्रवासी रोज प्रवास करतात. मागील काही वर्षात दिवा स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलला असला तरी येथील प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात रेल्वे प्रशासन सातत्याने अपयशी ठरत होतं. रेल्वे प्रवाशांना स्वस्त आणि स्वच्छ पाणी मिळावं यासाठी रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी मध्य रेल्वेवर सर्व स्थानकात वॉटर वेंडिंग मशीन स्थापित केल्या होत्या. सदर मशीन ला इतर स्थानकात अत्यल्प प्रतिसाद मिळाला असला तरी दिवा स्थानाकात वॉटर वेंडिंग मशीनला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद लाभत होता. पण कालांतराने त्या मशीन बंद झाल्या आणि दिवेकर रेल्वे प्रवाशांना पुन्हा पाण्यासाठी टाहो फोडत बसावं लागलं होतं. दिवेकर रेल्वे प्रवाशांना धड फलाटावरील कँटीन मध्ये सुद्धा पाणी मिळत नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. दिवा रेल्वे प्रवासी संघटनेनं याविषयी वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधून यावर तोडगा काढायची विनंती केली होती.
त्यानुसार रेल्वे प्रशासनाने दिवा स्थानकातील प्रत्येक फलाटावर पाणपोई चे काम सुरू केले असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची सोय होणार असल्याचे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य व दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड आदेश भगत यांनी सांगितले.