मुंबईतील भांडुप मधील अहिल्या विद्यालयाच्या बालवैज्ञानिक विद्यार्थ्यांची व विज्ञान शिक्षकांची विज्ञान भरारी.
मुंबई, ता 16 जाने ( संतोष पडवळ) : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था नागपूर यांच्या आदेशांन्वये गणित व पर्यावरण या विषयांवर 50 वे विभागस्तरीय विज्ञान प्रदर्शन शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग यांनी आय.आय.टी कॅम्पस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पवई येथे आयोजित केले होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी असा होता. या विज्ञान प्रदर्शनामध्ये अहिल्या विद्यालय भांडुप या शाळेच्या बालवैज्ञानिक विद्यार्थ्यांनी व विज्ञान शिक्षकांनी वैज्ञानिक साधनांच्या संकल्पनेतून पाच प्रकल्प सादर केले होते.त्यापैकी चार प्रकल्प उत्कृष्ट वैज्ञानिक साधन म्हणून अव्वल ठरले. शैक्षणिक साहित्य निर्मिती छोटा गट व मोठा गट द्वितीय क्रमांक अपंगांकरिता विशेष प्रकल्प प्रथम क्रमांक व प्रयोगशाळा सहाय्यक गट द्वितीय क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन साठी निवडले गेले.मुख्याध्यापक भगवंत डुंबरे बालवैज्ञानिक विद्यार्थिनी निकिता सिंग व विज्ञान शिक्षक नरेंद्र वाघमारे, दिशा दिवेकर, अमित राणे प्रयोगशाळा सहाय्यक संतोष कांबळी यांना शिक्षण उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले, प्रसंगी शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग, शास्त्रज्ञ, निमंत्रक, सहनिमंत्रक, विषय साधन व्यक्ती, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे सचिव प्रमोद मोरजकर व संचालिका श्रुती मोरजकर यांनी बालवैज्ञानिक विद्यार्थ्यांचा व विज्ञान शिक्षकांचा सार्थ अभिमान असल्याबाबतचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे व राज्य सहसचिव भानुदास शिंदे यांनी विजेत्या विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.