ठाणे महापालिकेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
सफाई कर्मचारी ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित
ठाणे (२६ जाने, संतोष पडवळ ): भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला, या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तद्नंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांना अग्निशमन दल व सुरक्षा दलाच्या जवानांनी सलामी दिली. दरम्यान, ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी आपले योगदान देणाऱ्या 10 प्रातिनिधीक सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत कामगार पुरस्कार आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते प्रदान करुन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी परिवहन समिती सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर महापालिका भवन येथील कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात पुजनिय नेत्यांच्या प्रतिमांना, तसेच शहरातील आदरणीय व्यक्तींच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2023 पर्यत चालणाऱ्या लोकशाही पंधरवडा या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारत सरकारच्या तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003, ई सिगारेट बंदीबाबतच्या दिनांक 18.9.2019 च्या अध्यादेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची शपथ यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात घेतली.