पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात ठामपाच्या शाळेतून मुख्यमंत्र्याचा सहभाग

शिक्षकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
ठाणे ता 27 (संतोष पडवळ) : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील विद्यार्थ्यांशी परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून संवाद साधला. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने किसननगर येथील शाळा क्र. 23 मध्ये विद्यार्थ्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आभासी माध्यमातून केले होते. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, शिक्षण उपसंचालक,मुंबई संदीप सनवे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, उपायुक्त अनघा कदम, तुषार पवार, शंकर पाटोळे आदी उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्रंथबुके देवून त्यांचे स्वागत केले.
विद्यार्थी जी परीक्षा देणार आहेत ती त्यांच्या आयुष्याची परिक्षा नाही ती केवळ त्यांनी केलेल्या अभ्यासाची परिक्षा आहे हे पंतप्रधानांनी त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे आनंदात, हसत खेळत परिक्षेला सामोरे गेले पाहिजे. स्पर्धा आपली दुसऱ्याशी नसून ती आपल्याशी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आपण दुसऱ्याशी स्पर्धा केली तर पुन्हा नैराश्य येते, असे सांगतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशभरातील विदयार्थ्यांसाठी आपला अमूल्य वेळ देणाऱ्या पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शिक्षकांचाही उल्लेख केला आहे. शिक्षक या व्यवस्थेतील महत्वाचा घटक असून विद्यार्थ्याला आकार देण्याचे काम ते करीत असतो. मुलांचे भवितव्य आणि भविष्य ते घडवत असतात. उद्याचा महाराष्ट्र आणि देश घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. शिक्षक ज्ञान दानाचे काम करीत असतो हे काम पवित्र काम आहे. त्यामध्ये त्यांनी कधीच कसूर करु नये. त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी दिली.