ठाणे मनपाच्या वतीने महाराजा सयाजी गायकवाड पुण्यतिथी निमित्त व्याख्यानमाला.
ठाणे ता 6 (संतोष पडवळ) : महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या संकल्पनेतून व्याख्यानमालेचे आयोजन हार्बर हॉल, टीपटॉप प्लाझा येथे करण्यात आले होते. यावेळी आधुनिक भारताचे शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जीवनपट ज्येष्ठ चरित्रकार प्रख्यात साहित्यिक प्रा. बाबा भांड यांनी रसिकांसमोर उलगडला. या कार्यक्रमास ज्येष्ठ लेखक अशोक चिटणीस, डॉ. शुभा चिटणीस, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक पत्रकार श्रीकांत बोजेवार, लेट्स रीड इंडियाचे प्रकुल्ल वानखेडे यांच्यासह ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी पुस्तके भेट देवून प्रा. भांड यांचा सन्मान केला.
प्रा. भांड यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचे, पुरोगामी विचारसरणीचे अनेक दाखले सादर करत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अनेक क्रांतीकारकांना मदत केली, त्यांनी त्यावेळी सुमारे 89 कोटींच्या (आजच्या काळानुसार सुमारे 2 लाख 90 हजार कोटींच्या) शैक्षणिक शिष्यवृत्या दिल्या. त्यांनी अनेक पुरोगामी कायदे केले, त्यांनी केलेले कायदे हे तत्कालीन युरोप आणि अमेरिकेच्या पुढे होते, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही नमूद केले होते. महाराजा सयाजीराव यांनी जात, पात, धर्माच्या भिंती पाडल्या, त्यांनी पुरोहितांसाठी कायदा केला होता, दुस-या धर्म परिषदेचे ते अध्यक्ष होते, वडिलांच्या संपत्तीत मुलीलाही अधिकार असल्याचा कायदा त्यांनी त्यावेळी केला, संन्यास घेण्यासाठीही कायदा केला, अशा अनेक अद्भभूत गोष्टी महाराजा सयाजी गायकवाड यांनी केलj असल्याचे त्यांनी नमूद केले.