ठाण्यातील रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करा, ठाणे खड्डेमुक्त करण्यात दिरंगाई नको – अभिजित बांगर, आयुक्त
ठाणे ता 10 (संतोष पडवळ) : मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘खड्डेमुक्त ठाणे’ साकारण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. राज्य सरकारने दिलेल्या ३९१ कोटी रुपयांमधून होत असलेली १५६ कामे आणि इतर रस्ते यांच्या कामांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठक घेतली.
‘खड्डेमुक्त ठाणे’ हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आतापासून कार्यकारी अभियंत्यांनी कामाला लागावे. पावसाळयात कोणत्या अडचणी येतात, त्यावर तोडगा काय आहे, हे आताच पाहून त्यांची कामे पूर्ण करावीत. रस्त्यांच्या कामात एक दिवसाचीही दिरंगाई नको, अशा स्पष्ट सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या. या बैठकीस, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता रामदास शिंदे, आय आय टी मधील प्राध्यापक के. व्ही. कृष्णराव, सर्व कार्यकारी अभियंते आणि कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘ खड्डेमुक्त ठाणे ‘ या अभियानात शहरातील ८.५ कि.मी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, २६.६९ कि.मी रस्त्याचे यू.टी.डब्ल्यू.टी पध्दतीचे काम, व ४७.५१ कि.मी रस्त्यांचे डांबरीकरण पध्दतीने पुर्नपृष्ठीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ३९१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यात एकूण ८२.७३ किमी रस्त्यांची १५६ कामे केली जाणार आहेत. हा निधी लगेच उपलब्ध व्हावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने रस्त्यांसाठी ठाणे महापालिकेस एकूण ६०५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यात, २२४ कोटी रुपयांच्या आणखी १२७ रस्त्यांच्या कामांचाही समावेश आहे.
कंत्राटदारांनी त्यांना मिळालेल्या सर्व रस्त्यांची कामे एकाच वेळी आणि त्वरित सुरू करावीत. तेवढ्या मनुष्यबळाची व्यवस्था आधीच करावी. कंत्राटदारांनी लक्ष्य निर्धारित करून त्याप्रमाणे उलट्या गणतीने काम सुरू करावे, तसेच, या कामांसाठी वाहतूक पोलिसांची परवानगीही कार्यकारी अभियंत्यांनी आधीच घेवून ठेवावी, अशा सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या. ३१ मे पूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर सक्त कारवाई करण्यात येईल. तसेच, दोष निवारण कालावधी (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) मध्ये रस्त्यावर खड्डा पडल्यास प्रत्येक खड्ड्यामागे (एक चौरस मीटर) एक लाख रुपयांचा दंड आकारला जाईल, अशा इशारा कंत्राटदारांना देण्यात आला. वेळेत काम पूर्ण झाल्यास देयके अदा करण्यासाठी सात दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही, याची हमीही महापालिका प्रशासनाने कंत्राटदारांना दिली आहे. कामाची अमलबजावणी तसेच, देयके याबाबत काही अडचणी आल्यास थेट आयुक्तांशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले.
कंत्राटदार आणि अभियंते यांच्या मनातील तांत्रिक शंकांचे निरसन करण्यासाठी आजची बैठक झाली. या सत्राचा अभियंते आणि कंत्राटदार यांना फायदा होईल. याशिवाय, प्रत्यक्ष काम करताना काही समस्या आल्यास नगर अभियंता यांच्या मार्फत आयआयटीच्या तज्ज्ञांशी संपर्क साधावा. रस्त्यांची कामे सुरू झाली की आयआयटीच्या टीमच्या साईटवर भेटी सुरू होतील. त्याशिवाय, कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामांना दररोज भेट देऊन कामाचा आढावा घ्यावा. दर एखाद्या ठिकाणी कमी दर्जाचे काम होत असेल तर अभियंत्यांनी कंत्राटदारावर कारवाईचा प्रस्ताव द्यावा. या कर्तव्यात दिरंगाई केली तर कार्यकारी अभियंत्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त बांगर यांनी दिला.
ठाणे शहरातील रस्त्यांच्या कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी आयआयटीमधील प्रा. के. व्ही. कृष्णराव आणि त्यांची टीम काम पाहणार आहे. कामात काही त्रुटी असल्यास ही टीम त्या दुरुस्त करण्यासाठी मार्गदर्शनही करणार आहे. या बैठकीत, कृष्णराव यांनी त्यांच्या गुणवत्तेबद्दल असलेल्या अपेक्षा विस्ताराने सांगितल्या. कोणत्या कामासाठी कोणती पद्धत, त्यासाठी लागणारे साहित्य, त्याचा दर्जा याबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच, डांबरीकरण, मास्टिक, सिमेंट काँक्रिटीकरण आणि यू.टी.डब्ल्यू.टी प्रकारचे काम यांच्या प्रचलित कामाच्या पद्धती जाणून घेतल्या. त्यात काही बदलही सुचवले. रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी, सगळे आराखडे, साधनसामुग्रीचे प्रमाण यांची माहिती तज्ज्ञांनी तपासून दिल्यावरच काम सुरू करावे, असे कृष्णराव यांनी स्पष्ट केले.
रस्त्यावर काम करताना तो स्वच्छ करून घेणे, रस्ता पूर्ण झाल्यावर खडीचा वापर टाळणे, डांबर आणि सिमेंट काँक्रिट यांचे तापमान योग्य राखणे यावर लक्ष दिल्यास रस्ते दर्जेदार होतील, असे कृष्णराव म्हणाले. तसेच, रस्त्यावर भेगा पडल्याच्या तक्रारी कमी करण्यासाठी त्यांनी तांत्रिक उपायही सुचवला. एक्सपांशन जॉईंटचा वापर आता बंद झाला आहे. त्यामुळे ठाण्यातही ती पद्धत वापरली जावू नये, असे कृष्णराव यांनी सांगितले.
मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील बदलत्या ठाण्यात स्वच्छ व सुंदर ठाण्याबरोबरच, खड्डेमुक्त ठाणे हे मुख्य अभियान आहे. स्वच्छ व सुंदर ठाणे अंतर्गत शहरातील सर्व रस्ते, सार्वजनिक जागा, पर्यटन स्थळे कायमस्वरुपी स्वच्छ ठेवणे, नेहमी कचरा पडणाऱ्या शहरातील सर्व जागा कचरामुक्त करुन त्या सर्व ठिकाणी सौंदर्यीकरण करणे, डेब्रिजमुक्त ठाणे शहर, शहरातील रस्ते, उड्डाणपूल यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करणे यांचाही समावेश आहे.
त्याचबरोबर, ठाणे शहर सौंदर्यीकरणाअंतर्गत शहरातील प्रवेशद्वार, शिल्पाकृतीसह चौक सुशोभीकरण, रस्ते सुशोभीकरण, भित्तीचित्रे, डिव्हायडर व कर्ब स्टोनची रंगरंगोटी, थर्मोप्लस्टिक पेंटद्वारे लेन मार्किंग व झेब्रा क्रॉसिंग, उड्डाणपुल, पादचारी पूल, खाडीवरील पूल, सरकारी इमारतींची रंगरंगोटी व विद्युत रोषणाई, मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करुन वृक्ष लागवड करणे याबद्दलही शहरात कार्यवाही सुरू आहे.