कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नातेवाईकांसाठीही विनामूल्य जेवण.
ठाणे ता 25 (संतोष पडवळ ) : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाच्या सेवेसाठी उपस्थित नातेवाईकांसाठी जेवणाची विनामूल्य सोय करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने अक्षय चैतन्य संस्था आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या साथीने हा उपक्रम नुकताच सुरु केला आहे.
सुरुवातीला दुपारी 12 ते 2 या काळात ही सुविधा उपलब्ध असून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन सायंकाळी 7 ते 9 या काळातही भोजनाची सोय करण्याचा विचार असल्याचे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. सध्या सरासरी 150 ते 200 नातेवाईक या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठिकठिकाणचे रुग्ण येतात. प्रत्येकापाशी पुरेसे मनुष्यबळ नसते. त्यामुळे सोबतीला असलेल्या नातेवाईकावर चांगलाच ताण येतो. अशात त्याला जेवणाची चिंता अधिक त्रासदायक ठरते. त्यातून मार्ग काढण्यासाठी अक्षय चैतन्य संस्थे पुढाकार घेतला.