कळव्यात स्लॅबचा भाग कोसळून दोघे अल्पवयीन जखमी
ठाणे ता 25 (संतोष पडवळ) : ठाण्यातील कळवा येथे असलेल्या विटावा सुर्या नगर येथील श्री साईनिवास बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर १०४ च्या स्लॅबचे प्लास्टर पडले या घटनेत, अक्षित आशिष सिंग (वय वर्ष ४) आणि आर्या (वय वर्ष ७) हे भाऊ बहीण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर या दोघांनाही उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांना किरकोळ दुखापत झाली असून स्लॅबचे प्लास्टर पडलेली रूम रिकामी करण्यात आली आहे. तसेच रूमला सील करून त्या रहिवाशांनी नातेवाईकांकडे हलविण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही इमारत अनधिकृत असल्याची माहिती प्रभाग समितीकडून देण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, कळवा विटावा येथे असलेले श्री साईनिवास बिल्डिंग ही तळ अधिक चार मजली असून ती १५ वर्षे जुनी आहे. तेथे एकूण ४५ कुटुंब वास्तव्यास आहेत. पहिल्या मजल्यावर रूम नंबर १०४ ही गौतम शहा यांच्या मालकीची असून त्यांनी ती रूम आशिष सिंग यांना भाड्याने दिली आहे. त्याच रूमच्या स्लॅबचे प्लास्टर पडले असून कॉलमला देखील तडे गेले आहेत. घटनास्थळी कळवा कार्यालयीन अधीक्षक सोपान बाईक यांच्यासह बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उप- अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (कळवा प्रभाग समिती) व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांनी धाव घेतली आणि जखमी झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल केले.