मुलाला चौकशीसाठी पोलिसांनी आणले असता भीतीपोटी पोलीस स्टेशन मध्येच वडिलांचा फिट येऊन मृत्यू.
ठाणे, कल्याण ता 25 (संतोष पडवळ) : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान प्रतिश भिंगारदिवे (२४) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. त्यामुळे त्याचे वडील दीपक भिंगारदिवे (६३) हे पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी मुलाला पोलीस ठाण्यात का आणले, याची विचारणा करू लागले. प्रतिशची पोलीस चौकशी करत असताना त्याचे वडील दीपक यांनी त्यांच्या मोबाईलमधून पोलीस चौकशीचे चित्रीकरण सुरू केले. मोबाईलमधून चित्रीकरण करू नये असे पोलिसांनी त्यांना समजावले आणि त्यांना पोलीस ठाण्यातील अंमलदार
कक्षामागील भागात बसवले. तेव्हा त्यांना फिट आली आणि ते जमिनीवर कोसळले. ताबोडतोब त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भिंगारदिवे कुटुंबियांचे आरोप…. प्रतिश सार्वजनिक ठिकाणी उभा असताना गस्तीवरील पोलीस त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मुलाला सोडवण्यासाठी वडील आणि भाऊ पोलीस ठाण्यात गेले. तेथे पोलिसांनी त्यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.