आपला कट्टा संस्था आयोजित एक सुट्टी हक्काची !
नवी मुंबई ता 27 मार्च (संतोष पडवळ) : जिजा माऊली गे तुला वंदना ही… छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊंना वंदन करून आपला कट्टा संस्था आयोजित एक सुट्टी हक्काची हा कार्यक्रम काल श्री सिद्धिविनायक मंदिर सभागृह, सेक्टर-५, ऐरोली येथे संपन्न झाला. श्री शिवराज्याभिषेक शकाचे साडेतीनशे वर्षाच्या आगमनाचे औचित्य साधून या संकल्पनेने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती चे अध्यक्ष श्री सुनील पवार, जेष्ठ समाजसेवक श्री रवींद्र आवटी, आपला कट्टा संस्था प्रमुख सल्लागार डॉ. अरुण औटी, अध्यक्ष सौ ममता भोसले, उपसचिव सिद्धेश गुरव, महेश परब, अमर गायकवाड, श्रीधर झरेकर, शैलेश म्हात्रे व आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या मातोश्रींचा सन्मान जिजाऊ पुरस्कार देऊन करण्यात आला. यावर्षीसाठीचा सामाजिक क्षेत्राचा पुरस्कार श्री विजय जाधव यांच्या मातोश्री श्रीमती ताराबाई जाधव यांना प्रदान करण्यात आला. कलाक्षेत्राचा पुरस्कार प्रसिद्ध छायाचित्रकार श्री पुष्पांक गावडे यांच्या मातोश्री श्रीमती नीता गावडे यांना देण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्राचा पुरस्कार अंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू शीतल भोर यांच्या मातोश्री सौ. अलका भोर यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून सर्वांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान सोहळा प्रसंगी महाराष्ट्र राज्य मंत्री व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ऐरोली शाखा अध्यक्ष मा. श्री विजयजी चौगुले साहेब उपस्थित होते.
मराठमोळा साज लेवून मराठी भाषेचा गोडवा गात सौ. शाम्भवी गुरव व सौ. दिपाली वारंग यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. माझे आरोग्य या सत्रात आपत्कालीन वैद्यकीय (medical emergency) परिस्थितीमध्ये तातडीचे उपचार म्हणून उपयुक्त असलेल्या कार्डियो पल्मनरी रेसॅसिटेशन (Cardiopulmonary Resuscitation) सीपीआर तंत्राचे प्रशिक्षण कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल द्वारे देण्यात आले. मी आणि माझी कला या सत्रात महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग घेऊन विविध कलाविष्कार सादर केले. पोवाडा, गोंधळ, पारंपरिक लोकगीत याचे सादरीकरण करण्यात आले.