समाज विकास विभागामार्फतच्या योजनांचा योग्य लाभ मिळावा – नरेश म्हस्के.मा महापौर

ठाणे, ता 28 मार्च (संतोष पडवळ) : ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी समाज विकास विभागामार्फत समाजातील गरजू महिला व दिव्यांगासाठी विविध योजना राबविल्या जातात. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी महिला व बालकल्याण समितीमार्फत सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत हे महत्वाचे उद्दिष्ट आहे, त्यानुसार अर्ज मागविण्यात आले होते.
सदर योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता काही योजनांसाठी उपलब्ध तरतुदीपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले तर काही योजनांमध्ये उपलब्ध तरतूदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे निधीचे योग्य वाटप होणार नाही, कमी अर्ज प्राप्त झालेल्या योजनांचा निधी शिल्लक राहणार व जास्त अर्ज प्राप्त झालेल्या योजनांतील काही अर्जदार यापासून वंचित राहणार आहेत. तरी प्राप्त झालेल्या सर्व अर्जदारांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून उपलब्ध निधीचे योग्य नियोजन आवश्यक आहे, जेणेकरुन सर्व अर्जदारांना याचा लाभ देणे शक्य होईल.
गरीब व आर्थिकदुर्बल घटकातील नागरिकांना स्वावलंबी करण्यासाठी विविध योजनांसाठी प्राप्त अर्जदारांचा विचार करुन त्यांना लाभ मिळेल यादृष्टीने नियोजन करुन पुढील कार्यवाही व संबंधितास आदेश व्हावेत असे निवेदन ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना नरेश म्हस्के, (शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख) मीनाक्षी शिंदे (शिवसेना महिला आघाडी प्रमुख) यांनी दिले असून प्रसंगी शिवसेनेचे मा उपमहापौर रमाकांत मढवी, राम रेपाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.