मराठी मनोरंजनसृष्टीच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाचे ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांची पत्रकार परिषदेत माहिती
…………………………
मुंबई दि.1 (संतोष पडवळ) : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांशी संबंधित व्यक्ती, संस्था यांना एकत्र आणत चित्रपट निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे शासकीय पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिली.
फिल्म बाजारच्या धर्तीवर विकसित करण्यात येत असलेल्या या फिल्मबाजार पोर्टलसाठी शासनाच्या वतीने समिती गठित करण्यात आली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तर प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी, दिग्दर्शक महेश कोठारे, निर्माते संजय जाधव, उद्योजक केतन मारू आणि संदीप घुगे हे या समितीचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. शासनाच्या वतीने पहिल्यांदाच चित्रपट लेखक, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार यांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे,
मराठी चित्रपटकर्मींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत असे पोर्टल सुरू होते आहे, याबद्दल महेश कोठारे यांनी समाधान व्यक्त केले. फिल्म बाजार ऑनलाईन पोर्टल हे मराठी मनोरंजन उद्योगातील सर्व घटकांना, व्यक्तींना आणि संस्थांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. चित्रनगरीचे नाव त्याच्याशी जोडले गेल्याने या पोर्टलच्या कामाला अधिक बळ मिळाले आहे, अशी भावना अभिनेता स्वप्नील जोशी यांनी यावेळी व्यक्त केली. पोर्टलसाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त चित्रपट निर्मात्यांपर्यंत पोहोचणे आणि ज्यांना चित्रपट निर्मितीसाठी सहाय्य हवे आहे त्यांच्यापर्यंत या निर्मात्यांना पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे पोर्टल पुढच्या सहा महिन्यांत पूर्णपणे कार्यरत होईल. मात्र पोर्टलचे काम प्रत्यक्षदर्शी पद्धतीने सुरू झाले असून यापुढेही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने काम होणार असल्याचे स्वप्नील जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चित्रपट वितरणासाठी प्रत्यक्ष चित्रपटगृहे, दूरचित्रवाहिनी आणि ओटीटीच्या माध्यमातून सहकार्य कसे करता येईल यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे समिती सदस्य केतन मारू यांनी सांगितले.