ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईत जप्त फळे व भाजीपाला सेवाभावी संस्थांना.
संतोष पडवळ – ठाणे
ठाणे ( ता 24) – ठाणे स्टेशन परिसर अतिक्रमणमुक्त असावा यासाठी मनपाने कडक मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. परंतु मागील काही दिवस यालगत असलेल्या नेताजी सुभाषचंद्र पथ ते कोपीनेश्वर मंदिर येथील मुख्य रस्त्यावर लागत असलेल्या भाजी मार्केट पथावर भाजी व फळे विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. सदरची अतिक्रमण तातडीने हटविणेबाबत संबंधितांना सूचना करण्यात आली होती. त्यानुसार कारवाई करुन यामध्ये जप्त करण्यात आलेली फळे व भाजीपाला आदीचे वाटप सेवाभावी संस्थांना करण्यात आले, यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
गेला आठवडाभर सकाळी 6.30 वाजल्यापासून दैनंदिन कारवाईची मोहिम सुरू आहे. सुभाष पथ येथील मुख्य रस्त्यावर लागत असलेल्या अनधिकृत भाजी मार्केटवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान भाजीपाला, फळे जप्त करण्यात आली असून सर्व भाजीपाला तसेच फळे सेवाभावी संस्थांना तसेच छत्रपती शिवाजी कळवा हॉस्पिटल येथील शिव प्रेरणा मंडळ, वर्तक नगर येथील दिव्यप्रभा महिला अनाथालय, माँ निकेतन महिला कामगार संस्था, नौपाडा येथील वुमेन्स वेल्फेअर फाऊंडेशन, नौपाडा कोपरी प्रभागतील बेघर संस्था, येउर येथील श्री सदगुरू सेवा मंदिर ट्रस्ट यांस देण्यात येत आहे.