दिव्यातील आठवडे बाजार पादचारी व रिक्षा चालकांच्या मुळावर…
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 1 मे : दिवा शहरात अनधिकृतपणे भरणारा आठवडाबाजार भर रस्त्यावर सुरू असतो. यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दिवेकर नागरिक करत आहेत तर आठवडी बाजारातील विक्रेत्यास विचारणा केल्यास आम्ही प्रत्येकी वीस रुपये महापालिकेच्या लोकांना देत असून जागेचे देखील १०० ते ५० रू प्रत्येकी भरतो असे सागितले जाते .
दातिवली नाक्या जवळील रस्त्यावर अनेक वर्षांपासून दर शनिवारी सायंकाळी आठवडा बाजार भरतो. शहरी भागात भरणारे आठवडा बाजार भाजीखरेदीसाठी सुरू करण्यात आले होते. मात्र या बाजारात परप्रांतीय विक्रेते भाजी, खाद्यपदार्थ सोडून वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवतात. ग्लोबल शाळेजवळील फूटपाथ आणि रस्ता या बाजारामुळे व्यापून जातो. सायंकाळी ४ वाजता सुरू होणारा हा बाजार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. परिणामी वाहतूक कोंडी होऊन रस्त्यावरून चालणे कठीण होते. बाजारात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे प्रकारदेखील घडतात. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना आहे. मंगळसूत्र चोरी, पाकीटचोरी असे प्रकार अनेक वेळा या बाजारात घडले आहेत. या रस्त्यावर असलेल्या सोसायट्यांमधून बाहेर पडणे देखील कठीण होते. लहान मुलांचे तर खूप हाल होतात. रस्त्याच्या मध्येच बाजार भरत असून रिक्षा चालक देखील मेटाकुटीला आले आहे एखाद्या अपघात झाला की मग राजकीय पक्ष, समाजसेवक हे रिक्षा चालक मालक संघटनेच्या नावाने बोंब मारतात व रिक्षा चालकांनवर कारवाई मोठे नुकसान सोचावे लागते. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर नावापुरती कारवाई केली जाते. मात्र या आठवडी बाजारावर कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही. महापालिका अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र महापालिकेने याची गंभीर दखल घेतलेली नाही. नागरिकांची गैरसोय करणाऱ्या या बाजारावर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.