लाचखोरीत ठाणे अव्वल क्रमांकावर.!
संतोष पडवळ – ठाणे
ठाणे, ता 4 मे : लाच लुचपत विभाग (एसीबीच्या) ठाणे परिक्षेत्रामध्ये २०२२ च्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये लाचखोरीसंदर्भात २९ गुन्हे दाखल झाले होते. याच कालावधीमध्ये यंदाच्या वर्षी लाचखोरी संख्या वाढल्याचे आढळून आले आहे. चालू वर्षी एप्रिल अखेर ३८ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यांमध्ये लाचेच्या मागणीचे सात गुन्हे आहेत. तर, अन्य गुन्ह्यांत लाच स्वीकारताना अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. बहुतेक गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरू असून यंदा आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये ५३ आरोपी आहेत. या आरोपींमध्ये लाचखोर कर्मचारी वर्ग १ चे दोन / वर्ग २ चे पाच / वर्ग ३ चे तीस /वर्ग ४ चे पाच कर्मचारी आढळून आले आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानंतर भरमसाठ पगारवाढ मिळूनही अनेक सरकारी कर्मचारी लाच मात्र घेत असल्याचा अनुभव नागरिकांना येतो आहे. लाच न दिल्यास काम रखडवले जात असल्याने नाइलाजास्तव लाच द्यावी लागत आहे. काहीजण पुढे येऊन लाचखोर अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करतात. परंतु अनेक नागरिक तक्रार करीत नाहीत. बहुतेक सरकारी कार्यालयांमध्ये कामांसाठी लाच मागितली जात असल्याचे एसीबीच्या कारवाईतूनच स्पष्ट होत असून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह, जे सरकारी कर्मचारी नाहीत, तेही लाच स्वीकारत आहेत.