दिवा पश्चिमेच्या पाणी प्रश्नावर आक्रमक युवासेनेचा आंदोलनाचा इशारा – अभिषेक ठाकूर
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 4 मे : ठाणे महापालिका हद्दीतील दिवा (प) विभागात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून नागरिकांना पाण्यासाठी अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. दिवा विभागातील एन.आर.नगर, नागवाडी, शनिवार वाडा, क्रिश कॉलनी, गावदेवी मंदिर, बंदर आळी, म्हात्रे आळी, मातोश्री नगर या विभागात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत आहे. येथे नियमित पाणी येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दिव्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी युवासेनेने पुढाकार घेतला असुन युवासेनेचे शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन पत्र दिले तसेच पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता श्री. वाघीरेंची भेट घेऊन तातडीने पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली.
सद्यस्थितीत दिवा पश्चिम विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत असल्याने या परिसरात पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात येण्याकरिता कार्यवाही करण्यात यावी तसेच तातडीने उपाययोजना करण्यात यावी तसेच याबाबत पंधरा दिवसांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी केली आहे.अन्यथा जनहितासाठी उग्र स्वरूपात जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला आहे.
यावेळी सोबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख सचिन पाटील, उपशहर संघटीका सौ. प्रियांका सावंत, विभागप्रमुख चेतन पाटील, उपविभाग प्रमुख संजय भोईर, शाखाप्रमुख प्रतिक म्हात्रे, ओकेश भगत उपस्थित होते.