दिवा शहरातील नालेसफाई मे अखेर पर्यंत पूर्ण होणार – रमाकांत मढवी, मा उपमहापौर.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता 4 मे : दिवा शहरातील नालेसफाई मे अखेर पर्यंत पूर्ण होईल असे प्रतिपादन मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केले आहे. ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी पावसाळ्याच्या अगोदर 31 मे पर्यंत ठाणे मनपा हद्दीतील सर्व गटर व नालेसफाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असून नाल्यातील काढलेल्या गाळाची ४८ तासांच्या आत विल्हेवाट लावणे, काढलेल्या गाळावर जंतुनाशक व दुर्गंधीनाशक यांची फवारणी करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास प्रती घटना दंड आकारण्याची तरतूद निविदेत करण्यात आली आहे. त्याचबरोबर, नाले सफाई करणाऱ्या कामगारांना गमबुट, मास्क, हातमोजे पुरवणे आवश्यक आहे. नाले व गटार व्यवस्थित साफ न केल्याने पाणी साठल्यास प्रती घटना २० हजार रुपयांच्या दंडाची आकारणी केली जाणार आहे. पावसाळ्यात गटारे तुंबल्यास सफाईचे काम ठेकेदाराला करावे लागेल असे आदेश दिले आहेत.
वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहरातील गटर व नालेसफाई ( रेल्वे कलव्हर्ट , रोड कलव्हर्ट, मुख्य रस्त्यावरील / स्लम मधील / गावठाण मधील सर्व अंतर्गत गटर व नाले सफाई ) संदर्भात ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर याच्या बरोबर चर्चा करण्यात आली. प्रसंगी ठाणे माजी महापौर नरेशजी म्हस्के, मा. स्थायी समिती सभापती राम रेपाळे व माजी उपमहापौर रमाकांत मढवी व अनेक माजी नगरसेवक /नगरसेविका उपस्थित होत्या.