ठाण्यात रस्त्यांच्या कामात त्रुटी ; कंत्राटदार कंपनीला 5 लाखांचा दंड
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे (30 मे ) : ठाणेकर नागरिकांना चांगल्या दर्जाचे खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी ठाणे शहराला राज्यशासनाकडून उपलब्ध झालेल्या 605 कोटी रुपयांच्या निधीतंर्गत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांची पाहणी नुकतीच मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी केली. या पाहणीदौऱ्यादरम्यान कामांमध्ये रस्ते साफसफाई व इतर कामांबाबत त्रुटी आढळल्या, मा. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सदर कामाबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कार्यकारी अभियंता यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस तर ठेकेदाराला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात (22 मे रोजी) ठाणे शहरातील रस्ते आणि नाले सफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात वसंत विहार येथील कॉनवुड चौक येथील मलनिस्सारण कामाची पाहणी करून कामास विलंब झाल्याबद्दल कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
ठाणे शहरासाठी राज्य शासनाकडून ६०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या अंतर्गत सध्या २८२ रस्त्यांची कामे प्रभाग समितीनिहाय सुरू आहेत. यात २१४ कोटी रुपयांच्या पहिल्या पॅकेजमध्ये १२७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. तर उर्वरित ३९१ कोटी रुपयांच्या दुसऱ्या पॅकेजमध्ये १५५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, सरकारी योजनांमधून सुरू असलेली रस्त्यांची कामे, इतर प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी देखील मा. मुख्यमंत्री यांनी केली.