पावसाळ्यातील वाहतूककोंडीसाठी मनपा व वाहतुक विभागाने नियोजन करावे : अभिजित बांगर,आयुक्त, ठाणे.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ( ता 09 जून ) : ठाणे रेल्वे स्टेशनबाहेरील रस्ता हा फेरीवाला मुक्त केल्यामुळे येथून नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया विविध माध्यमातून येत आहेत. सदरच्या परिसरात महापालिका व वाहतूक पोलीस यांच्या समन्वयाने करण्यात आलेली कार्यवाही कायमस्वरुपी ठेवावी. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात देखील शहरातील महत्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करुन तात्काळ त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत सर्व संबंधितांना दिले.
ठाणे रेल्वेस्थानकाच्या धर्तीवर वर्दळीच्या ठिकाणी देखील वाहतूक नियोजन होणे गरजेचे आहे. गावदेवी परिसर हा वर्दळीचे ठिकाण असून वाहतूक आणि पादचारी यांचे परिचलन योग्यपध्दतीने व्हावे यासाठी तेथे सद्यस्थितीत लावण्यात आलेले बोलार्ड कायमस्वरुपी ठेवावे, पोलार्ड काढल्यास तेथून वाहतूक सुरू होवून पादचाऱ्यांना त्रासाचे ठरेल. मात्र हे करत असताना कोणाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. सदर परिसरात पादचाऱ्यांना विशेषत: महिला वर्गाला ये-जा करताना गैरसोय होणार नाही या दृष्टीने वाहतूकीचे परिचालन करण्याबाबत महापालिका व वाहतूक विभागाने समन्वय साधून निर्णय घ्यावा अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी बैठकीत दिल्या.