दिवा-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान नवीन रेल्वे स्थानक !
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मागणी नंतर रेल्वे प्रशासनाची जागेसाठी चाचपणी…
*संतोष पडवळ – प्रतिनिधि*
ठाणे, दिवा ता 13 जून : दिवा डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान नवीन स्थानक व्हावं अशी मागणी १९८५ पासून येथील नागरिक सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे करत आहेत. यासाठी अनेक निवेदन व पाठपुरावा येथील ग्रामस्थांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केल्याचे समजत आहे. दिवा-डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान म्हातार्डेश्वर मंदिराजवळ नवीन स्थानक व्हावं अशी मागणी असताना मध्य रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे कानाडोळा करत डोंबिवली स्थानका जवळ नवीन कोपर स्थानकाला मंजुरी दिली होती. त्यामुळे आता आपण करत असलेली मागणी पूर्ण होणार नाही अशी येथील ग्रामस्थांची धारणा झाली असतानाच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मागणीमूळे नवीन स्थानक होण्याचा आशा पुन्हा पल्लवित झाल्या असल्याचे दिसून येते.
खासदार शिंदे यांनी नुकतीच मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकांची भेट घेतली होती. भेटीदरम्यान दिवा रेल्वे स्थानकात कोकणात जाणाऱ्या स्पेशल गाड्यांना थांबा मिळावा व दिवा कोपर दरम्यान नवीन स्थानक निर्माण करावे अशा इतर मागण्या केल्या होत्या. त्यानुसार आज मध्य रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकाऱ्यांनी दिवा-कोपर रेल्वे स्थानका दरम्यान नवीन स्थानकाच्या नियोजित जागेची पाहणी केली. प्रसंगी मा. उपमहापौर रमाकांत मढवी, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत, विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, विनोद मढवी, शशिकांत पाटील, भूषण पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सर्वप्रथम खासदार शिंदे यांचे आभार व्यक्त करताना म्हटले की,भविष्यात म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनच स्टेशन होणार असल्याने मध्य रेल्वे मार्गावर दिवा आणि कोपर दरम्यान रेल्वे स्टेशन होणे ही काळाची गरज बनली आहे.शिवाय दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे. त्यामुळे दिवास्थानकाचा भार सुद्धा या नवीन रेल्वे स्थानकामुळे कमी होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे दिवा रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला आहे. खासदार डॉ. शिंदे यांची कार्यपद्धती लक्षात घेता गेल्या अनेक वर्षापासून ची ग्रामस्थांची मागणी देखील पूर्ण होईल असा आशावाद दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.आदेश भगत यांनी व्यक्त केला.