दिव्यातील बेडेकर नगरला रस्ता नसल्याने रोप-वेची मनसेची आयुक्तांकडे मागणी.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 19 जून : दिवा शहरातील बेडेकर नगर मधील रविना अपार्टमेंट परिसरात नागरिकांना गेल्या कित्येक वर्षांपासून रहदारीसाठी रस्ताच उपलब्ध नसून त्यामुळे विभागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणिबाणीच्या काळात रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाची गाडी याठिकाणी जाणे सुद्धा शक्य नाही. सदर विभागात रस्ता बनविण्यासाठी मनसेकडून यापूर्वीही दोन पत्र देण्यात आली होती. रस्ता बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा योग्य तो मोबदला जमीन मालकांना देऊन तातडीने रस्ता बनवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी भूमिका मनसेने मांडली होती.
पण वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत कुठलीही प्रगती होत नसल्याने आज दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त मनीष जोशी यांची भेट घेतली. दिवा आगासन रस्त्यावरून बेडेकर नगर परिसरात येण्या-जाण्यासाठी रस्ताच होत नसल्याने येथील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी किमान रोप वेची सुविधा उपलब्ध करून देण्याची खोचक मागणी बेडेकर नगरच्या महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
प्रसंगी दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, विभाग सचिव परेश पाटील, गटाध्यक्ष लकी माळकर आणि महेंद्र मळेकर उपस्थित होते.