ब्रेकिंग : भांडुपमधील प्रसिद्ध व्यावसायिक प्रशांत विचारे यांचा संशयास्पद मृत्यू
दि. १६, मुंबई,(किशोर गावडे)
मुंबईतील भांडुप उपनगरामध्ये प्रसिद्ध व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत तुकाराम विचारे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून त्यांचा मृतदेह संशयास्पदरित्या वाशी खाडीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेली ५ दिवसांपासून ते गायब होते, त्यांच्या कुटुंबीयांनी ते मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाणेत दिली होती. मात्र, अचानकपणे रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह वाशीच्या खाडीमध्ये आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळी वाशी खाडी जवळून जाणाऱ्या काही प्रवाशांच्या निदर्शनास हा मृतदेह आला. त्यानंतर त्यांनी वाशी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा मृतदेह भांडुप उपनगरातील प्रशांत तुकाराम विचारे या 54 वर्षीय व्यावसायिकाचा असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मृतदेहाबद्दल अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मृतदेह खाडीमध्ये नेमका आला कसा याबाबत पोलीस तपास सुरु आहे. प्रशांत विचारे हे व्यवसायिक आहेत. त्यांचा मृतदेह खाडीत सापडल्याने ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत तर्क वितर्क सुरु आहेत.
पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.