⭕️धक्कादायक, अलिबागमध्ये मुला- मुलीला विष पाजून पतीपत्नीची आत्महत्या
अलिबाग, 17 मे : अलिबागमध्ये फिरण्यासाठी आलेल्या एका जोडप्याने आपल्या मुला-मुलीला विष देवून हत्या केली आणि त्याननंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अलिबाग शहरातील A B कॉटेजमध्ये हा प्रकार घडला आहे. मयत पती पत्नी हे दोघेही पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील रहिवासी होते. हे जोडपे 11 मे पासून अलिबागमध्ये मुलगा आणि मुलीसह वास्तव्यास होते. आज रूममध्ये गेल्यानंतर सकाळपासून दरवाजा उघडत नसल्याने तसेच काहीच हालचाल दिसून येत नव्हती. त्यामुळे कॉटेजमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना संशय आला. आज दुपारी 3 च्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला असता मुलांचे मृतदेह बेडवर आढळून आले. तर दोघांनी गळफास लावलेला दिसून आला. सदर घटनेची अलिबाग पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात नेले असून त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. प्रसंगी यातील मृत महिला हरविल्याची फिर्याद तिच्या पतीने 1 मे रोजी शिक्रापूर पोलीस ठाण्यात नोंदविली होती अशी माहिती समोर आली आहे. प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.