विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या मतमोजणीसाठी ठाणे जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज.

0

ठाणे,दि.22(संतोष पडवळ ):- सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मतदान पार पडले असून येत्या शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा, पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी केंद्रात सकाळी 08.00 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात टेबल व फेऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी दिली.
*134 भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ*
134 भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी फरहान खान हॉल ममता हॉस्पिटल पाठीमागे मिल्लत नगर भिवंडी-421302. येथील केंद्रावर होणार आहे. मतमोजणीसाठी 14 टेबल व 5 टपाली मतदानासाठी टेबल असणार आहेत. एकूण 25 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेसाठी 158 अधिकारी, कर्मचारी व 200 पोलीस नेमण्यात आले आहेत.
*135 शहापूर (अज) विधानसभा मतदारसंघ*
135 शहापूर (अज) विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी डॉ.शिवाजीराव जोंधळे इंटरनॅशनल स्कूल, आसनगाव ता.शहापूर येथे होणार आहे. मतमोजणीसाठी 19 टेबलांवर 24 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीसाठी 110 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
*136 भिवंडी (पश्चिम)विधानसभा मतदारसंघ*
136 भिवंडी (पश्चिम)विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी वऱ्हाळदेवी माता मंगल भवन कामतघर भिवंडी -421302 येथील केंद्रावर होणार आहे. मतमोजणी 22 फेऱ्यांमध्ये होणार असून त्यासाठी 14 टेबल ईव्हीएम व 2 टेबल टपाली मतपत्रिकेसाठी असणार आहेत. या प्रक्रियेसाठी 203 अधिकारी, कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
*137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ*
137 भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी संपदा नाईक सभागृह, भादवड येथे होणार आहे. यासाठी 150 कर्मचाऱ्यांची व बंदोबस्तासाठी 150 पोलीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण 23 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून 14 टेबल्स असणार आहेत. दोन टेबल हे टपाली मतमोजणीसाठी आहेत. व्हीव्हीपॅट करता एक टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
*138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ*
138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, वसंत व्हॅली रोड, वृंदावन पॅराडाईज,गंधार नगर, खडकपाडा, कल्याण येथील केंद्रात होणार असून मतमोजणीसाठी 160 व बंदोबस्तासाठी 300 पोलीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण 23 फेऱ्या होणार असून ईव्हीएमसाठी 20 व टपाली मतदानासाठी 7 टेबल असणार आहेत.
*139 मुरबाड विधानसभा मतदारसंघ*
139 मुरबाड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरबाड येथे होणार असून मतमोजणीसाठी 21 टेबल असून एकूण 25 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीसाठी 200 अधिकारी, कर्मचारी व 300 पोलीस नियुक्त करण्यात आले आहे.
*140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ*
140 अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी महात्मा गांधी विद्यालय, नगरपालिका कार्यालय समोर अंबरनाथ पश्चिम येथे होणार आहे. या मतमोजणीच्या 25 फेऱ्या होणार असून त्यासाठी ईव्हीएमसाठी 14 टेबल्स, टपाली मतपत्रिकेसाठी 6 व व्हीव्हीपॅटसाठी 1 टेबल असणार आहे.
मतमोजणीसाठी 186 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले असून पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे.
*141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ*
141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, पवई चौक उल्हासनगर-3 येथे होणार आहे. ही मतमोजणी 14 टेबलवर ईव्हीएम आणि 5 टेबलवर पोस्टल असे एकूण 19 टेबलवर संपन्न होणार असून, मतमोजणीच्या जवळपास एकूण 19 फेऱ्या होणार आहेत. या मतमोजणीसाठी शंभरहून अधिक अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
*142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात 24 फेऱ्या*
142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी महिला उद्योग केंद्र, रॉयल रेजन्सीच्या पाठीमागे, राजाराम जाधव मार्ग, साईनाथ, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर, कल्याण पूर्व, ता.कल्याण- 421306 येथील मतमोजणी केंद्रात होणार आहे. यासाठी 150 अधिकारी व कर्मचारी नेण्यात आले असून पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मतदारसंघात एकूण ईव्हीएमसाठी 14 व टपाली मतदानासाठी दोन टेबल ठेवण्यात आले असून एकूण 24 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
*143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ*
143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरेंद्रनाथ बाजपेयी बंदिस्त सभागृह, सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व. येथे होणार आहे. यासाठी 158 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 300 पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे.
या मतदारसंघात ईव्हीएमसाठी 14 व टपाली मतदानासाठी 2 टेबल असणार असून सुमारे 21 फेऱ्या होणार आहेत.
*144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ*
144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील डोंबिवली पूर्वेतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे होणार असून ही मतमोजणी 19 टेबल्सवर संपन्न होणारअसून, मतमोजणीच्या एकूण 31+1 (PB) फेऱ्या होणार आहेत. या मतमोजणीसाठी 150 अधिकारी व कर्मचारी तसेच 150 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
*145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ*
145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी स्व. प्रमोद महाजन हॉल, भाईंदर (पू) येथे होणार असून 250 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर बंदोबस्तासाठी 120 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. या मतदारसंघात 24 फेऱ्या होणार असून त्यासाठी 21 टेबल असणार आहेत. तर टपाली मतपत्रिकेसाठी 3 टेबल असणार आहेत.
*146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ*
146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी न्यू होरायझॉन स्कूल, आनंदनगर, ठाणे येथील केंद्रात होणार असून त्यासाठी 250 अधिकारी व कर्मचारी तर बंदोबस्तासाठी 120 पोलीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण मतमोजणीच्या 24 फेऱ्या होणार असून त्यासाठी एकूण 27 टेबल आहेत. ईव्हीएमसाठी 21 तर टपाली मतदान मोजणीसाठी 6 टेबल असणार आहेत.
*147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ*
147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघासाठी आय टी आय, वर्कशॉप -1, वागळे इस्टेट, ठाणे येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी ईव्हीएमसाठी 14, पोस्टल पत्रिकांसाठी तीन व ईटीपीबीएससाठी 1 टेबल असणार आहे. एकूण 28 फेऱ्या होणार आहेत.
मतमोजणीसाठी 18 मतमोजणी सुपरवायझर आणि 18 मतमोजणी सहाय्यक आणि 22 सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी 150 पोलीस असणार आहेत.
*148 ठाणे विधानसभा मतदारसंघ*
148 ठाणे विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी न्यु होरायजन एज्युकेशन सोसायटी, इमारत सी, रोडास सोसायटीजवळ, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत रोड, ठाणे 148- ठाणे येथील केंद्रावर होणार आहे. या मतदारसंघात 27 फेऱ्यांमध्ये मोजणी होणार असून त्यासाठी 22 टेबल ठेवण्यात आले आहेत.
मतमोजणीसाठी 150 अधिकारी कर्मचारी व बंदोबस्तासाठी 60 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ*
149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुल, कौसा मुंब्रा येथे होणार असून मतमोजणीसाठी 182 अधिकारी कर्मचारी तसेच 150 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या मतदारसंघात मतमोजणीच्या 21 फेऱ्या होणार असून त्यासाठी 27 टेबल असणार आहेत.
*150 ऐरोली मतदारसंघ*
150 ऐरोली मतदारसंघाची मतमोजणी सरस्वती हायस्कूल सेक्टर 05 ऐरोली येथे होणार असून एकूण 20 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीसाठी 19 टेबल असणार आहेत.मतमोजणीसाठी 150 अधिकारी व कर्मचारी आणि 150 पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.
*151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ*
151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आगरी कोळी भवन, नेरूळ येथे होणार असून एकूण मतमोजणीच्या 28 फेऱ्या होणार आहेत. त्यासाठी 14 टेबल असून टपाली मतपतमतपत्रिकेसाठी 4 टेबल आणि व्हीव्हीपॅटसाठी वेगळा एक टेबल असणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी 200 अधिकारी, कर्मचारी आणि 300 पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ईव्हीएम यंत्रे ही संबंधित मतदारसंघातील स्ट्रॉंगरुममध्ये अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. ही ईव्हीएम यंत्रणे निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सिलबंद करण्यात आल्या आहेत. तसेच स्ट्राँगरुम भोवती केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल व स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!