मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजपने घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता २७ नोव्हें : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री पदावरून मोठा पेच निर्माण झाला होता. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याचे वृत्त होते. या पदावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचंही म्हटलं जातं होतं. मात्र या सर्व चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी आज अखेर पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. मी नाराज नसून आम्ही रडणारे नसून लढणारे आहोत. तसंच मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजपाने घ्यावा तोच निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल असं एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट केलं. ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यांची मुख्यमंत्री पदाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
राज्यात मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाला होता. भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरीही ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली झाल्याने त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मागितल्याची चर्चा होती. दरम्यानच्या काळात अनेक चर्चा समोर येऊ लागल्या. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री करणार किंवा केंद्रात कॅबिनेट पद देणार किंवा श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करणार अशा चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरणात संभ्रमता निर्माण झाली होती. निकाल लागल्याच्या चार दिवसांनंतरही मुख्यमंत्री ठरत नसल्याने सामान्य नागरिकांनी रोष व्यक्त केला. दरम्यान आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेंडू थेट भाजपाच्या वरिष्ठ पातळीच्या कोर्टात टाकला आहे. म्हणजेच त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. असं असलं तरीही राज्यात उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा प्रश्न अनुत्तरीतच आहे यावरही त्यांनी भाष्य केलं.