टिटवाळा ते शिळफाटा बाह्यवळण रस्त्यात अडथळा ठरणारी १२५ बांधकामे जमीनदोस्त.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ७ डिसें : टिटवाळा-कल्याण-डोंबि वली ते शिळफाटा दरम्यानच्या ३० किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्ते मार्गात अडथळा ठरणारी १२५ बांधकामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे मागील काही वर्षापासून अटाळी भागात रखडलेला बाह्यवळण रस्ते मार्गाचा टप्पा बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत टिटवाळा-आंबिवली अटाळी-गांधारे पूल-वाडेघर ते दुर्गाडी किल्ला-पत्रीपूल ते मोठागाव-कोपर-भोपर ते शिळफाटा- काटई-हेदुटणे असा ३० किलोमीटर लांबीचा कल्याण व डोंबिवली शहराबाहेरून जाणारा बाह्यवळण रस्ता उभारणीचे काम सुरू आहे. या रस्त्यामधील टिटवाळा ते वाडेघरपर्यंतचे रस्ते बांधणीचे टप्पे पूर्ण झाले आहेत. या टप्प्यामधील अटाळी भागात वळण रस्त्याच्या मार्गात १२५ चाळ, झोपड्यांची बांधकामे होती.
या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न काही वर्षापासून रखडला होता. हा प्रश्न आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या पुढाकाराने मार्गी लागला. त्यामुळे आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी अतिक्रमण नियंत्रण, फेरीवाला हटाव पथक, जेसीबी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दिवसभरात अटाळी भागातील वळण रस्ते कामाला अडथळा ठरणारी १२५ बांधकामे जमीनदोस्त केली