ब्रेकिंग ; पुणे जिल्ह्यातील दोन धरणात बुडून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे, ता 20 मे (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील चासकमान व भाटघर या दोन धरणांत बुडून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मृतांमध्ये 5 महिलांचा आणि 4 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पुण्याच्या पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. रितीन डी. डी, नव्या भोसले, परीक्षित आगरवाल आणि तनिष्का देसाई अशी चासकमान धरणात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तसेच, भाटघर धरणात बुडून मृत्यू होणाऱ्यांमध्ये खुशबू संतोष रजपूत (19), मनिषा लखन रजपूत (20), चांदणी शक्ती राजपूत (21), पूनम संदीप रजपूत (22), मोनिका रोहित चव्हाण (23) यांचा समावेश आहे.
अधिक माहितीनुसार, गुंडाळवाडी परिसरात असलेल्या चासकमान धरणार गुरुवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर चौघांचेही मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आले. रितीन डीडी, नव्या भोसले, परिक्षित आगरवाल आणि तनिष्का देसाई हे सर्व जण परराज्यातून शिक्षणासाठी आले होते.
चासकमान धरणालगत असलेल्या बुरसेवाडी हद्दीतील कृष्णामूर्ती फाउंडेशनच्या सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल या शाळेची शुक्रवार २० मेपासून सुटी लागणार होती. त्यामुळे या शाळेच्या शिक्षकांसह 34 विद्यार्थी गुरूवारी संध्याकाळी 4.30 वाजता चासकमान धरणाजवळ गेले. त्यानंतर सुट्टीचा आणि धरणातील पाण्याचा आनंद घेण्यासाठी हे विद्यार्थी पाण्यात उतरले. त्यानंतर काही विद्यार्थी पोहण्याचा मोह आवरला नाही म्हणून कमरेपर्यंतच्या पाण्यात उभे राहिले. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडात असल्याची माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली. त्यावेळी उपस्थित शिक्षकांनी त्यातील काही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, चौघे जण बुडाले. त्यानंतर तेथील ग्रामस्थांच्या मदतीने चारही मुलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी चाकण येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.