धक्कादायक ; पत्नी नांदायला येत नाही म्हणून पती चढला हायव्होल्टेज विदयुत टॉवरवर
संगमनेर, ता 20 मे (प्रतिनिधी) : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नी नांदायला न आल्याने एक तरुण थेट विजेच्या टॉवरवरच चढला. यावेळीही त्याने टोकाची भूमिकाही घेतली. केशव काळे असे या मुलाचे नाव आहे. तो 23 वर्षांचा आहे. पत्नी माझ्यासोबत आली नाही तर मी आत्महत्या करेन, असा निर्धार त्यांनी केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्याला पत्नीशी बोलणं करुन देतो, असा विश्वास दिला. यानंतर त्याने टॉवरवरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
केशव मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचा आहे. त्यांची पत्नी मूळची पुण्यातील जुन्नर तालुक्यातील आहे. दोन वर्षांपूर्वी दोघांची भेट झाली होती. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांचे चार महिन्यांपूर्वी घरच्यांच्या संमतीने लग्न झाले होते. यानंतर दोघेही कामानिमित्त चाकण, पुणे येथे राहू लागले.
केशव दारू प्यायचा. त्याच्या या सवयीमुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. भांडण इतके वाढले की 1 एप्रिल रोजी केशव पत्नीला माहेरी सोडून निघून गेला. त्यानंतर दोघांचे बोलणे बंद झाले. मात्र, गुरुवार 19 रोजी केशव कुटुंबीयांना घेऊन पत्नीच्या घरी गेला. यावेळी सर्वांनी तिला घरी परत येण्याची विनंती केली. मात्र, नांदायला येणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यामुळे केशवला खूप राग आला. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास तो रागाच्या भरात हाय टेन्शन टॉवरवर चढला. पत्नी सोबत आली नाही तर जीव देईल, असा टोकाचा पवित्राही त्याने घेतला.