ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजन.


संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे (२०) : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने सोमवारी सकाळी ठाणे महानगरपालिकेतर्फे ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ दिंडीत महापालिकेच्या शाळांचे विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. ग्रंथ दिंडीनंतर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी, कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्गघाटन केले.

‘म’ मराठीचा या संकल्पनेवर आधारित ग्रंथ दिंडीची सुरुवात महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणातून झाली. ‘गोड बोलू, मराठी बोलू’, ‘माझी भाषा, मराठी भाषा’,
‘अभिजात भाषा, मराठी भाषा’, ‘माय मराठी, माझी मराठी, ‘ लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी या घोषणांना आसमंत निनादून गेला. पारंपरिक पोशाख केलेले महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच लेझीमच्या सुरावटींवर शिस्तबद्ध सादरीकरण करणारे महापालिका शाळांतील विद्यार्थी यांच्यामुळे संपूर्ण वातावरण मराठमोळ्या रंगात न्हाहून निघाले होते.

ग्रंथ दिंडी लेझिम, ढोल-ताशाच्या गजरात महापालिका मुख्यालयासमोरील चौकापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन, ज्ञानराज मंदिरमार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगण अशी निघाली होती. फुलांनी सजवलेल्या पालखीत ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान यांच्यासह वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकांचे साहित्य ठेवण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदापुरे, उमेश बिरारी, अनघा कदम, मिताली संचेती, मनोहर बोडके, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, सचिन सांगळे, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख, महापालिका कर्मचारी या ग्रंथदिंडीत पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. मुख्यालयात परतल्यावर महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुरेख लेझिम नृत्य सादर केले.

ग्रंथदिंडी विसर्जित झाल्यानंतर, कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी, अतिरिक्त (१) आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे आणि उमेश बिरारी उपस्थित होते.

आपल्या मराठी भाषेसाठी संवर्धनासाठी हा मराठी भाषेचा पंधरावडा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने महापालिकेने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यापैकी आज ग्रंथ दिंडी आणि ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन आणि पुस्तक विक्री मंगळवार, २१ जानेवारी रोजीही सुरू राहणार आहे. ते सर्व नागरिकांसाठी खुले आहे. त्यामुळे त्यांनी देखील या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.

तसेच, वाचन या छंदाला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. या प्रदर्शनात किमान पाचशे रुपयांची पुस्तके तरी प्रत्येकाने आपल्या मराठी भाषेसाठी, मराठी मातीसाठी विकत घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. ग्रंथ दिंडी तसेच प्रदर्शनाच्या सोहळ्याचे सूत्र संचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले.

🎯प्रदर्शन नागरिकांसाठी खुले.

महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहातील प्रदर्शन व पुस्तक विक्री ही नागरिकांसाठी खुली आहे. मंगळवार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. त्यात, प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्याकडील दुर्मिळ आणि जुनी पुस्तके पाहता येतील. तसेच, त्यांच्यासह साहित्य अकादमी, मॅजेस्टिक बुक डेपो आणि वयम मासिक यांच्या स्टॉलवर पुस्तकांची खरेदीही करता येईल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!