ब्रेकिंग ; जळगाव जवळ एक्सप्रेसने उडविल्याने ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू

संतोष पडवळ – प्रतिनिधी
जळगाव ता २२ जाने : पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून उडी मारली. याच दरम्यान समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं आहे. यामध्ये आतापर्यंत 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
जळगावमध्ये मोठा आणि विचित्र रेल्वे अपघात घडला आहे. या घटनेत 8 जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, अचानक ब्रेक मारल्यामुळे पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागली अशी अफवा पसरली. आगीच्या भीतीने आपला जीव वाचवताना प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या मारल्या. मात्र यावेळी याच ठिकाणी समोरून आणखी एक रेल्वे येत असल्याचं प्रवाशांना दिसलं नाही. या कर्नाटक एक्स्प्रेसने उड्या मारणाऱ्यांना धडक दिली आणि एकच गोंधळ उडाला.
मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेस जळगावमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघाली होती. परांडा स्थानकाआधी ट्रेन थांबली होती. यावेळी काही प्रवासी खाली उतरले. त्यावेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने धडक दिली. यामुळे मृतांचा आकडा वाढून ११ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून भुसावळमधून वैद्यकीय मदत पाठवण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे