⭕️ब्रेकिंग, भिवंडीत नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (NCB) केलेल्या छापेमारीत 864 किलो कफसिरफ जप्त.
ठाणे, भिवंडी, ता 23 मे (प्रतिनिधी) : नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने केलेल्या छापेमारीत अवैधपणे विक्रीस नेण्यात येणाऱ्या कोडीन आधारित कफसिरपचा साठा पकडण्यात आला. प्रसंगी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 864 किलो (8640 बाटल्या) कोडीन आधारित कफ सिरप जप्त करण्यात आला आहे.जप्त केलेल्या या बाटल्यांची किंमत अंदाजे 35 लाख रुपये इतकी आहे. एनसीबीने अंमली पदार्थ पुरवठादार आणि पेडलर्स विरुद्ध सतत लढा देत ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत कारवाई केली. या कारवाईमध्ये एनसीबीने एक बोलेरो पिकअप आणि एका दुचाकीसह कफ सिरप जप्त केले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्यामाहितीच्या आधारे एनसीबी मुंबईच्या
एका पथकाने भिवंडीजवळ आग्रा-मुंबई महामार्गावर पाळत ठेवली आणि एक बोलेरो पिकअप अडवली. वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनात 60 बॉक्समध्ये एकूण 864 किलो (8640 बाटल्या) कोडीन आधारित कफ सिरप पद्धतशीरपणे भरलेले आढळले. एनसीबीने हे सर्व
जप्त केले. जप्त केलेल्या औषधांची वाहतूक करणाऱ्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने वाहकाची अधिक चौकशी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन तासांनंतर रीसीव्हरला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. सुमारे दोन किमी पायी पाठलाग केल्यानंतर त्याला
पकडण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे या बाटल्या मुंबई आणि ठाण्यातील विविध भागांमध्ये नशेच्या उद्देशाने पुरवण्यात येत होत्या. एनसीबी मुंबईने या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू असल्याचे अमित घावटे, आयआरएस, झोनल डायरेक्टर, एनसीबी, मुंबई यांनी सांगितले, अमित घावटे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन राबवण्यात आले.