दिवा पश्चिम स्मशानभूमीला पाणी व रात्र कामगारांचा अभाव. भाजप युवा मोर्चाचे सतिश केळशीकरांचे सहायक आयुक्तांना निवेदन.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २४ जाने सप्टेंबर : दिवा पश्चिमेकडील स्मशानभूमीत पाणी व रात्र कामगारांचा अभाव असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रचंड अस्वच्छता असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची पाण्याअभावी व रात्रीचा मनपा कर्मचारी नसल्याने प्रचंड गैरसोय निर्माण झाली असून लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दिवा पश्चिम येथील स्मशानभूमीत पाणी नसल्याने बोरवेल घेऊन पाणी उपलब्ध करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून केली जात आहे तर स्मशानभूमीत रात्रपाळी कर्मचारी नसल्याने रात्रीच्या वेळी मृतदेहावर अंतिम संस्कार करता येत नसून अंतिमसंस्कार साठी रात्रभर थांबावे लागते. दिवा पूर्वेस मृतदेह नेण्यासाठी रेल्वे फाटक बंद असते तथा उड्डाणपूल देखील पूर्ण झाला नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी भाजप युवा मोर्चाचे सतिश केळशीकर यांना अनेक नागरिकांनी तक्रारी केल्याने केळशीकर यांनी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्याकडे सदर स्मशानभूमीत तात्काळ बोरवेल उपलब्ध करून रात्रपाळी कामगारांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. दिवेकरांसाठी सदर लाजिरवाणी बाब दिसून येते असून अनेक जेष्ठ नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. प्रकरणी नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व ठाणे महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी दर्शवली आहे.