दिव्यातील 3 इमारतींवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारवाईसाठी ठामपा सरसावली… मात्र १३६ कुटुंबांच्या आक्रोशापुढे हतबल…

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दि. २५ जाने : दिवा आगासन रोडवर १८ वर्षे जुन्या तीन इमारतींवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करण्यासाठी शनिवारी गेले होते. यावेळी येथील रहिवाशांनी विरोध केल्याने महापालिकेला केवळ येथील नव्याने बांधण्यात आलेल्या दोन गाळ्यांवरच कारवाई करुन परतावे लागले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
दिवा चौक भागात तळ अधिक तीन मजल्याच्या या इमारती असून त्या साधारण १२/१३ वर्षे जुन्या आहेत. याठिकाणी १३६ कुटुंबे वास्तव्यास असून याठिकाणी ३२ गाळे आहेत. येथील इमारत धारकांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर डीम कनव्हेन्ससाठी प्रक्रिया सुरु केली होती. त्याचवेळेस जागा मालक आणि रहिवाशांमध्ये वाद झाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते. मधल्या काळात क्लस्टर मार्फत करण्यात आलेल्या सर्वेत या तीनही इमारती पात्र ठरल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान ठाणे पालिकेने येथील रहिवाशांना नोटीसा देऊन न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने शनिवारी कारवाई हाती घेतली होती. कारवाईसाठी महापालिका पोलीस बंदोबस्तासह दाखल झाली होती. परंतु यावेळी रहिवाशांनी कारवाईला तीव्र विरोध केला. प्रसंगी येथील शिवसेना शहरप्रमुख रमांकात मढवी यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच मनसे पदाधिकारी देखील याठिकाणी मदतीला धावले. येथील रहिवाशांना देखील आपली बाजू मांडण्यासाठी संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच या इमारती जुन्या असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रसंगी येथे नव्याने बांधण्यात आलेले दोन व्यावसायिक गाळे तोडण्यात आल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे.