सालोख आदिवासी दफन भूमी प्रश्न प्रकरणातील त्या मुस्लिम व्यक्तीवर कारवाईची कर्जत आदिवासी समाजाकडून मागणी. नेरळ पोलिसांना निवेदन सादर.

ता १ फेब्रुवारी 2025
कर्जत: सुमित क्षिरसागर
सालोख ग्रामपंचायत हद्दीतील नारळाचीवाडी येथील आदिवासी समाजाच्या जागेवरील दफन स्मशानभूमीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने जेसीबीच्या साह्याने येथील जमिन साफ करून मृतदेहांची अवहेलना केल्याने येथील समाज आक्रमक झाला होता. दरम्यान आता दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असताना कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेकडून सबंधिष दोषींवर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
कर्जत तालुक्यातील मौजे सालोख येथील रहिवाशी असलेले ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला या व्यक्तीने गावाला लागून असणाऱ्या नारळाचीवाडी येथील आदिवासी समाजाच्या मालकीच्या सर्वे नंबर ७२/२ ही क्षेत्र ८ एकर जागेवर जेसीबीच्या साह्याने जागा खोदून ती साफ केली होती. या जागेवरील झाडे देखील तोडण्यात आली होती. जागा साफ करीत असताना या जागेवरील दफन भूमीतील मृतदेहांची विटंबना करून मृतदेहाचे अवशेष हे उघड्यावर टाकले होते. त्यामुळे येथील जागा मालक बुधाजी पदू थोराड यांनी व ग्रामस्थानी यावर आक्षेप घेतला होता. विनापरवाना जागेवर अतिक्रमण त्याच बरोबर आदिवासी ठाकूर सामजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी तहसीलदार, सरपंच, तलाठी मंडळ अधिकारी व वनविभागाला देखील याबाबत कळविले होते. मात्र यावर ठोस उपाय निघत नसून अधिकारी हे प्रकरण दाबण्याचा तयारीत असल्याने, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कर्जत तालुका आदिवासी ठाकूर समाज संघटनेने या प्रकरणात उडी घेत संबंधित दोषींवर कारवाईसाठी नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरोडा यांनी पोलीस अधिकारी ढवळे यांना ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला व सबंधित व्यक्तीवर अनुसूचित जाती जमाती १९८९ कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावे अशी मागणी केलेली आहे. यावेळी जागेचे मालक बूधाजी पदू थोराड यांच्यासह आदिवासी समाज मोठ्या संख्येने नेरळ पोलीस ठाण्यात पोहचले होते.
सदर जागा आदिवासी समाजाची असताना ताहिर सैरे आणि तौसिफ मुल्ला यांनी ही जागा आदिवासी समाजाची माहित असताना जागेत कोणाच्या सांगण्यावरून जेसीबी चढवला असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असुन, ही जागा मुंबई स्थित धनिकला विकल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे अशा दोषींवर महसूल विभाग अधिकारी,पोलीस प्रशासन काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार असुन, विकण्यात आलेली सदर जागा ही शासनाच्या देखभालितील असल्याने व ती एस टी समजासाठी कसण्यासाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आले असल्यामुळे परस्पर जागेची खरेदी विक्री करणाऱ्या वर देखील कारवाई व्हावी म्हणून मागणी पुढे येत असून हे प्रकरण चिघळणार की क्षमणार या कडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.