ठाणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार
ठाणे (२५ मे, प्रतिनिधी ): ठाणे शहरातील नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रातील असलेल्या धोबीघाट जलकुंभाची ३०० मीमी व्यासाची मुख्य वितरण जलवाहिनी, साईतीर्थ टॉवर येथे व बारा बंगला सर्कल येथील धनेश्वर मंदिर येथे सॅटीस प्रकल्पाचे कामांतर्गत बाधीत होत असल्याने, स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. सदरचे काम अत्यंत तातडीचे असल्याने शुक्रवार दिनांक २७ मे, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते शनिवार दिनांक २८ मे, २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
सदर शटडाऊनमुळे ठाणे पुर्वेकडील संपुर्ण कोपरी परिसरातील सिध्दार्थ नगर, शांतीनगर, चंदणी कोळीवाडा, साईनगरी, साईनाथ नगर मस्ताननगर, ठाणेकर वाडी, कोपरी गाव, धोबीघाट, नातु परांजपे कॉलनी, स्टेशन परिसर, आदर्शनगर, सुदर्शन कॉलनी, आनंदनगर, गांधीनगर, कानेवाडी, सिध्दीविनायक नगर, केदारेश्वर नगर तसेच नवजीवन सोसायटी परिसर आदी परिसराचा पाणी पुरवठा वरील कालावधीत पुर्णपणे बंद राहणार आहे.
वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
…………………………………