कुर्ला वर्तमानपत्र विक्रेता संघाकडून जागतिक महिलादिन उत्साहात साजरा…

संतोष पडवळ, कुर्ला, मुंबई
मुंबई, कुर्ला ता ८ मार्च :
कुर्ला रेल्वेस्टेशन बाहेर वृत्तपत्र विक्रेत्या महिला एका वेगळ्याच उत्साहात पहाटे चार पासून कामाला लागल्या होत्या. कारणही तसेच होते त्यांचा सत्कार जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात येणार होता.
कुर्ला वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
श्री अजय उतेकर यांनी उपस्थित वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात केली. योगा प्रशिक्षक आणि आहार तज्ञ श्रीमती उर्मिला शरद देवरुखकर यांनी महिलांना फिटनेस संदर्भात मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व वृत्तपत्र विक्रेत्या महिलांना एक महिना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचे त्यांनी जाहीर केले.
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष श्री. मधुसूदन सदडेकर यांनी मालवणी भाषेत सर्व वृत्तपत्र विक्रेत्या महिलांनी स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आणि त्यांच्या उज्वल आर्थिक, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी देवास गाऱ्हाणे घातले. बृहन्मुंबई
वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस श्री. संजय चौकेकर यांनी सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी एकमेकांना प्रतिस्पर्धी म्हणून न पाहता मित्र म्हणून पाहण्यास सुरुवात करावे जेणेकरून एकमेकांना सहाय्य करून आपला व्यवसाय वाढविण्यास मदत होईल असे सांगितले. पुरुषांची मक्तेदारी असलेला वृत्तपत्र वितरणाच्या व्यवसायात महिला तितक्याच हिरीरीने कार्य करतात आणि आपले कुटुंब ही सांभाळतात ही फार मोठी प्रशंसनीय गोष्ट आहे. त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन आणि दाद देण्यासाठी सर्व महिलांना पुष्पगुच्छ, भेटवस्तू व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सर्व महिलांनी केक कापून व एकमेकांस देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईतील सर्व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी देखील या सोहळ्यास उपस्थित होते.