नेरळमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला ; भव्य दिव्य मिरवणूक.. शिवजयंती मिरवणुकीचे विशेष आकर्षण बाहूबली हनुमान.

नेरळ: सुमित क्षिरसागर
नेरळ ता १७ मार्च : नेरळमध्ये तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून या निमित्ताने शहरातील विविध भागात शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित देखावे व तसेच प्रत्येक चौकात महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी मंडळांच्या वतीने मंडप उभारण्यात आले होते.
काल सायंकाळी नेरळ शहर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील विविध भागातून वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी सोहळ्यात आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये हजारो शिवप्रेमी,नागरिक महिला वर्ग सहभागी झाले होते. यावेळी शहरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या सजावटीचे नेरळकरांकडून कमिटीचे विशेष कौतुक करण्यात येत होते.
सकाळी शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीने सर्व चौकांमध्ये अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कमिटीच्या वतीने महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकातून शिवजयंती मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. नेरळ शहरातून हेटकरआळी, टेपआळी मागें पाडा, अंबिका नाका तेथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नेरळ बाजारपेठ मार्गे खांडा तेथून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कुंभारआळी मार्ग चेडोबा मैदानात मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल साळुंखे, उपाध्यक्ष प्रमोद कराळे, सुरज साळवी, सचिव आशिष जोशी, सहसचिव सुनील शिंगवा, खजिनदार प्रतीक भिसे, सह खजिनदार प्रीतम गौरी व उत्सव समितीचे पदाधिकारी महिला वर्ग शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.