दिव्यातील शीळ भागातील पत्रकाराला दोघांची जबर मारहाण… ठाणे, दिवा पत्रकार संघटनांकडून जाहीर निषेध

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २८ मार्च : दिव्यातील शीळगाव भागातील पत्रकार विनोद वास्कर यांना शिळफाटा चौकात दोन तरुणांनी जबर मारहाण केल्याची घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली आहे. शीळ गावातील ग्रामदेवतेच्या जमिनीच्या वादातून सदर प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून सदरच्या घटनेमुळे शिळ गावातील ग्रामस्थ शिळं डायघर पोलीस ठाण्यात मोठया संख्येने जमले होते. पत्रकार विनोद वास्कर यांना पुढील उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरु आहेत.
प्रकरणी हल्लेखोर राहुल काटे आणि जितू आलीमकर या दोघांनी शिळं गावातील भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रकाशित करत असल्याने ही घटना घडली असल्याचे समजत असून मारहाण केल्यानंतर दोघेही फरार झाले असून डायघर पोलीसांनी पुढील तपास सुरु केला असून लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. प्रकरणी सदर घटनेचा ठाणे, दिवा पत्रकार संघटनाकडून निषेध व्यक्त होत असून दोन्हीही आरोपीनां तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षण कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.