दहिवलीतील श्री महालक्ष्मी मूर्तीचे संवर्धन व साती आसरा देवस्थान बांधण्यात येणार – आमदार श्री महेंद्र थोरवे.

कर्जत : सुमित क्षिरसागर
कर्जत ता ३१ मार्च : गेल्या ५८ वर्षांपासून विस्मृतीत गेलेल्या दहिवली गावच्या श्री महालक्ष्मी ग्रामदेवतेची मूर्ती अखेर उजेडात आली असून, तिला संवर्धनीत करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नदीघाटाच्या सुशोभीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. याच ठिकाणी श्री महालक्ष्मी मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे, त्यामुळे संपूर्ण दहिवली गावासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे तसेच ही मूर्ती ज्या ठिकाणी सापडली तिथेच गावाच्या वेशीच्या देवता साती आसरांचे देवस्थान आहे ज्याचा कुलाचार भोई समाज करत असतो.
पुरातत्व संशोधक श्री सागर सुर्वे यांनी दहिवली गावातील श्री महालक्ष्मी मूर्तीचा शोध घेत असताना या मूर्तीच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांच्या संशोधनानुसार, ही मूर्ती शिलाहारकालीन असून ती बाराव्या शतकातील दोहनपल्ली (सध्याचे दहिवली) गावाचा एकमेव ठोस पुरावा आहे. श्री सागर सुर्वे यांच्या अभ्यासानुसार, शिलाहार राजवटीत दहिवली गाव धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते. त्या काळात गावामध्ये अनेक मंदिरे आणि स्थानक स्वरूपातील मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. श्री महालक्ष्मी ही त्या काळातील स्थानक मूर्तींपैकी एक असून, तिची मूळ प्रतिष्ठापना दहिवली गावाच्या केंद्रस्थानी एका प्रमुख मंदिरात करण्यात आली होती.
मूर्तीची वैशिष्ट्ये आणि पूजा पद्धती
श्री महालक्ष्मीची ही द्विभुज मूर्ती दगडी असून, तिच्या कानातील कर्णफुले विशेष वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गावात ही मूर्ती गावाच्या केंद्रस्थानी होती आणि तिच्या पूजेसाठी विशिष्ट धार्मिक विधी प्रचलित होते. विशेषतः, ग्रामस्थ मूर्तीला ‘कौल’ लावून महत्त्वाचे निर्णय घेत असत. ब्राह्मण स्त्रिया मूर्तीच्या नाभीत सुपारी ठेवून कौल मागत असत. गुरव समाजाचे सदस्य मूर्तीच्या मांडीवर गुलाबाच्या पाकळ्या चिकटवून कौल घेत असत. प्राप्त झालेल्या संकेतांनुसार गावात धार्मिक निर्णय घेतले जात असत.
सन १९६५ मध्ये काही स्थानिक ग्रामस्थाने ही मूर्ती भग्न केली. या घटनेनंतर तात्काळ धार्मिक विधी करून ही भग्न मूर्ती उल्हास नदीत विसर्जित करण्यात आली. विसर्जनाच्या वेळीही ही मूर्ती कौल देत असल्याचा उल्लेख ऐतिहासिक नोंदींमध्ये आढळतो. विशेष म्हणजे, नवीन मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निर्णयासाठीही विसर्जित मूर्तीला कौल लावण्यात आला आणि अनुकूल संकेत मिळाल्यानंतरच नवीन मूर्ती आणण्यात आली. संशोधनातून या मूर्तीच्या विसर्जनाची माहिती समोर आली. श्री सागर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करून मूर्तीचा शोध घेतला गेला आणि ती नदीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. विशेष म्हणजे, उल्हास नदी ही पश्चिम घाटातील वेगवान नद्यांपैकी एक असूनही ही मूर्ती वाहून गेली नाही, उलट प्रवाहाच्या विरोधात राहिली, हा एक विस्मयकारक ऐतिहासिक योगायोग ठरला. ही मूर्ती फक्त धार्मिकच नव्हे, तर पुरातत्त्वीयदृष्ट्याही महत्त्वाची आहे. शिलाहारकालीन स्थापत्यशैली, दगडी कोरीवकाम आणि प्राचीन धार्मिक परंपरांचा अभ्यास करण्यासाठी दहिवली गावातील एकमेव ठेवा आहे.
याच ऐतिहासिक वारशाच्या पुनरुज्जीवनासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे दहिवली गावाचा हा ऐतिहासिक वारसा नव्याने उलगडणार असून, श्री महालक्ष्मी मूर्तीच्या संवर्धनाच्या तयारीला गती मिळणार आहे.
यावेळी आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्याचा धार्मिक व सांस्कृतिक इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “इतिहास जपणे ही आपल्या संस्कृतीची गरज आहे. कर्जतचा सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहास पुन्हा जिवंत करणे आणि त्याला अधिक महत्त्व देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.”
यावेळी सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले आणि भोई समाजासह सर्व ग्रामस्थांशी संवाद साधला. या सोहळ्यास कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक ॲड संकेत भासे, संजय मोहिते,दिनेश कडू,गणेश कनोजे, अतुल पवार,अशोक महाडिक अभिषेक सुर्वे, सुनिल जाधव,अतुल पवार, सुदेश देवघरे, सुनिल पवार, भरत बामणे,अतिश सकपाळ आणि श्री जितेश पवार आणि गावातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.