माथेरान येथे २८ एप्रिलला स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०२५ सोहळा ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, मनोज खांबे व अनिल गवळे मानकरी.

कर्जत : सुमित क्षिरसागर
राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य जेष्ठ पत्रकार स्व. संतोष पवार यांच्या स्मृती, तत्व यांचे स्मरण राहण्यासाठी दरवर्षी स्व.संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन येते. यंदा २८ एप्रिल रोजी माथेरान येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर तर स्व.सुनील दांडेकर स्मृती रायगड जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक सागरचे स्थानिक संपादक मनोज खांबे यांना स्व. धर्मानंद गायकवाड तालुकास्तरीय पुरस्कार कर्जत येथील येथील दै.कृषीवलचे पत्रकार अनिल गवळे यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच यावर्षीपासून माथेरान सन्मान म्हणून सामाजिक कार्यकर्ते नितीन शहा यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण माथेरान येथे २८ एप्रिल रोजी होणार आहे.
माथेरान येथील रहिवासी आणि महाराष्ट्र राज्यात वावर असलेले जेष्ठ पत्रकार संतोष पवार यांचा कोरोना काळात विषाणूचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला होता. स्व. संतोष पवार हे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी एक आदर्श होते. कर्जत तालुक्यातील पत्रकारांना त्यांच्या विचारांचा परिस स्पर्श झालेला आहे. पत्रकारिता हि तत्वाने आणि सर्वसामाविष्ट करत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी कशाप्रकारे असावी याचे धडे त्यांनी कायम आपल्या विचारातून दिले. त्यामुळेच आज स्व.संतोष पवार हे आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची मशाल कायम तेवत राहणार आहे. यासाठीच कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या अगोदर संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक दिव्य मराठी या वृत्त समूहाचे संपादक संजय आवटे, दैनिक लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर, दैनिक रामप्रहरचे संपादक देवदास मटाले, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांना तर जिल्हास्तरीय जेष्ठ पत्रकार पुरस्कार कर्जत येथील जेष्ठ पत्रकार विजय मांडे, पनवेलचे जेष्ठ पत्रकार माधव पाटील, रायगड टाइम्सचे संपादक राजन वेलकर, खोपोलीचे ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ यांना देण्यात आला होता. तर कर्जत प्रेस क्लबमधील युवा पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचे दोनवर्षापूर्वी एका अपघातात निधन झाले होते. त्यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार गेल्यावर्षी माथेरानचे पत्रकार अजय कदम यांना दिला गेला होता.
यंदा स्व.संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर यांना, स्व.सुनील( दादा ) दांडेकर स्मृती रायगड जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार दैनिक सागरचे स्थानिक संपादक मनोज खांबे यांना तर स्व. धर्मानंद गायकवाड स्मृती तालुकास्तरीय पुरस्कार दै.कृषीवलचे पत्रकार अनिल गवळे यांना जाहीर करण्यात आला असून माथेरान सन्मान म्हणून सामाजिक कार्यकर्ते नितीन शहा यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचे वितरण माथेरान येथील प्रीती हॉटेल येथे सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.
दरम्यान या सोहळ्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, जेष्ठ कवी अरुण म्हात्रे, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्यासह माथेरान नागपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, विवेक चौधरी, प्रेरणा सावंत यांच्यासह माथेरानमधील सर्व पक्षाचे, सामाजिक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश पवार आणि माथेरान प्रेस क्लबचे अध्यक्ष गिरीश पवार यांनी जाहीर केले आहे.