सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सुत्रसंचालक प्रदीप भिडे यांचं निधन
सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सुत्रसंचालक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने आज निधन झालं आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बातम्या देणाच्या खास शैलीमुळे ते ओळखले जायचे.
१९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात झाली. तर, १९७४ पासून प्रदीप भिडे यांनी दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदनाला सुरुवात केली. त्या काळात केवळ अर्धा तासच बातम्या सांगितल्या जायच्या. मात्र आपल्या भारदस्त आवाज आणि बातमी देण्याच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे ते जनमाणसांत प्रसिद्ध झाले. वयाच्या २१ व्या वर्षांपासून भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली होती. दूरदर्शनच्या वृत्तविभागामध्ये अनुवादक म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मराठी वाड्मय, नाटके, कादंबऱ्या, एकांकिका या विषयांमध्ये त्यांना विशेष रस होता. त्यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचं वृत्तनिवेदन केलं आहे.