मुंबईतील मानखुर्दमधील मंडळ परिसरात भीषण आग ; लाखोंचं नुकसान
मुंबई, ता 9 जून (प्रतिनिधी) : मुंबईतील मानखुर्दमधील मंडळ परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या परिसरात विविध प्रकारची गोडाऊन आहेत. या आगीमुळं परिसरात उंच धुराचे लोट दिसत आहेत. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मानखुर्दमधील मंडळ परिसरात तेलाची गोडाऊन, साबन बनवण्याचे कारखाने, कागद बनवणे, फर्निचर बनवण्याचे कारखाने यासह विविध प्रकारची गोडाऊन आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सात ते आठ गाड्यांसह पोलीस आणि मुंबई पालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग भीषण स्वरूपाची असून लांबूनच मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दिसून येत आहेत.